महाराष्ट्राला जिगरबाज महिलांची परंपरा लाभली आहे. पुरातन काळापासून तर आताच्या अवकाश वीरांगनांपर्यंत महिला अनेक क्षेत्रात स्त्रीशक्तीच्या रुपाने कार्यरत आहेत. स्वयंपाकात निपूण महिला तेवढ्याच ताकदीने वनांचे रक्षणदेखील करीत आहेत. देशातील ४८ व्याघ्र प्रकल्पांपैकी आकारमानानुसार चौथ्या क्रमांकावर असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अनेक महिला, मुली कार्यरत आहेत. त्यामध्ये अकोट वन्यजीव परिक्षेत्रांतर्गत कार्यरत वनपाल नीलिमा रमेश उगले या ग्रामपरिसर विकास समितीच्या माध्यमातून उत्तम काम करत आहे. जल व मृद संधारणाच्या कामासाठी त्यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्प दिनी गौरविण्यात आले. विशेष म्हणजे दिव्यांग असलेल्या या मुलीने एकाच वेळी दोन ते तीन ग्रामपरिसर विकास समितीमध्ये उत्तम काम केले आहे. त्यासोबतच वनविभागाच्या हरीसाल येथील निसर्ग संकुलात ४० प्रकारच्या दुर्मिळ वनोषधींची लागवड करण्यात आली आहे. रुपाली येवले नावाची वनरक्षक जीवापाड या वनौषधींना जपत आहे. व्याघ्रनखीपासून अश्वगंधा तर पांढऱ्या मुसळीपर्यंत सर्व प्रकारच्या वनौषधी या प्रकल्पात आहे. वनरक्षक, वनपाल म्हणून काम करणाऱ्या मुली आणि महिलांना जंगलातील श्वापदांचा कधी सामना करावा लागेल याचा नेम नाही. रुपाली येवलेसोबतच आर.एस. पवार, आर.एस. येवले या दोन वनरक्षक मुलींचा कामाचा झपाटा त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा दर्शवितो. नुसतेच वनसंरक्षण नाही तर वन्यजीवांच्या अवैध शिकारी आणि अवैध वृक्षतोडीलादेखील वनरक्षक ए.एस. येवले या तरुण व शूर मुलीने आळा घातला आहे. रानडुकराच्या अवैध शिकारप्रकरणही तिने उघडकीस आणले. गुगामल वनक्षेत्रातील रिना पवारने तर मुरूम वाहतूक करताना सरळ टॅ्रक्टर सहित चालकाला पकडून दिले व मुरूम जप्त केला. तसेच त्याच गुगामल वनक्षेत्रातील एच.एस. कास्देकर या वनरक्षक मुलीने एकटीने अवैध मुरुम वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडून जप्त केले. हे सर्व करीत असताना आपण स्त्री आहोत अशी कोणतीही दुय्यम भावना या वनरक्षकांच्या मनात आली नाही. या मुलींनाच खरे निसर्गरक्षक संबोधता येईल.
जिगरबाज महिला वनरक्षक
By admin | Published: March 08, 2016 12:05 AM