अमरावती : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांचे वेतन सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्राजेक्ट) प्रणालीव्दारे करण्यासाठी झेडपीचे शिक्षण सभापती सुरेश निमकर यांच्या अध्यक्षतेखाली १० जणांची समिती २२ जून रोजी जालना दौऱ्यावर जात आहे. ही समिती जालना जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जात असलेल्या सीएमपी प्रणालीची प्रक्रिया कशा पध्दतीने राबविली जात आहे. याची माहिती जाणून घेणार आहे.
अमरावती झेडपीच्या अखत्यारित कार्यरत शिक्षकांचे वेतन ऑफलाईन पध्दतीने अदा केले जात आहे. या प्रक्रियेमुळे शिक्षकांचे दरमहा मिळणारे वेतन बरेचदा उशिरा होतात. त्यामुळे शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीव्दारे करावे, अशी मागणी शिक्षक संघटनांनी अध्यक्ष बबलू देशमुख यांच्याकडे लावून धरली. याची दखल घेत यापुढे शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीने करण्यासाठी ज्या जिल्हा परिषदेत ही प्रणाली राबविली जात आहे, तेथील या प्रक्रियेची माहिती जाणून घेण्यासाठी १० सदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. त्यानुसार ही समिती मंगळवार, २२ जून रोजी जालना जिल्हा परिषदेला भेट देऊन सीएमपीची प्रक्रिया समजून घेणार आहे. समितीचे अध्यक्ष शिक्षण सभापती सुरेश निमकर असून, उपमुख्यलेखा अधिकारी दत्ता फिसके, प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान, लेखाधिकारी प्रवीण मोंढे, अमोल इखे, अधीक्षक अश्र्विनी पवार, विजेंद्र दिवाण, सचिन पोहरकर, प्रमोद ठाकरे, नागोराव नगराळे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सदस्यांत समावेश आहे.