अमरावती : जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचारी यांच्या आस्थापनाविषयक बाबी अद्ययावत, कार्यपद्धतीचे सुलभीकरण करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजीता महापात्र यांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी ‘प्रशासन दिवस’ प्रत्येक विभागात राबविला जाणार आहे. यानुसार बुधवार ४ सप्टेंबर रोजी पहिला प्रशासन दिवस जिल्हा परिषदेसह, पंचायत समितीस्तरावर राबविण्यात आला.
बदलत्या नवीन तंत्रज्ञानामुळे प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत. ज्यामध्ये कार्यालमधील दैनंदिन ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. त्यानुसार कर्मचारी, अधिकारी यांच्या आस्थापनाविषयक बाबी अद्ययावत करणे, कार्यपद्धतीचे सुलभीकरण, कार्यालयातील वातावरण सुधारणा व स्वच्छता, अभिलेख वर्गीकरण आदी बाबी वेळेत पूर्ण करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशीलता आणण्यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व आस्थापना, कार्यालये यांचेस्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला बुधवार ‘प्रशासन दिवस’ म्हणून राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सीईओ संजीता महापात्र यांनी घेतला आहे. यानुसार दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी प्रशासन दिनाचे आयोजन करून आस्थापनाविषयक प्रकरणांची निपटारा करावा आणि टप्प्याटप्प्याने प्रलंबित शून्यावर आणावी,जसे की खाते चौकशी प्रकरणे, निलंबन, अनधिकृत गैरहजरी प्रकरणे, निवृत्तिवेतन-कुटुंब निवृत्तिवेतन विषयक प्रकरणे, सामान्य भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठता सूची, कर्मचाऱ्यांची स्थायित्व प्रमाणपत्रे, मूळ व दुय्यम सेवापुस्तके, अद्ययावत करणे, न्यायालय अधिकारी टिप्पणीतील मुद्यांचे अनुपालन, ५४ व ३० वर्ष आढावा, गोपनीय अहवाल यासारखी कामे प्रशासन दिवसात केली जाणार आहेत. यामध्ये काही विषयांमध्ये वाढ करण्याची मुभा मुख्यकार्यकारी अधिकारी सीईओ संजीता महापात्र यांनी संबंधित विभागाचे विभागप्रमुखांना दिली आहे.