अमरावती : गत दोन दिवस पडलेल्या संतधार पावसामुळे जिल्हा परिषद उपाध्यक्षांचे दालन असलेल्या छतावर मोठया प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे दालनावरील पीओपीमध्ये पाणी साचून हे छत जमिनीवर पडल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडल्याने थोडक्यात दुर्घटना टळली. परिणामी जीवितहानी झाली नाही.
जिल्हा परिषदेतील बहुतांश विभागाच्या इमारती या फार जुन्या आहेत. त्यामुळे त्याची नियमित देखभाल दुरुस्ती होणे आवश्यक आहे. पावसाच्या दिवसात तर ही बाब अत्यावश्यक असते. मात्र, असे असतानाही पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी असलेल्या कार्यालयात देखभाल दुरुस्तीचे कामे वेळेवर होणे आवश्यक असते. याकरिता सतत बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला जातो. मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. परिणामी उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांच्या दालनातील कक्षाचे पीओपीचे छत पडल्यावरून हे स्पष्ट झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या दालनालगत उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांचे दालन आहे. त्यांच्या दालनातील पीओपीमध्ये पाणी साचल्याने छत कोसळण्याच्या घटना उघडकीस येतात. तातडीने बांधकाम विभागाने दालनातील दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
बॉक्स
पंचायत पाणीपुरवठा विभागातही पाणी गळती
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातीलही कर्मचाऱ्यांसाठी बसण्याच्या जागेमध्ये पाण्याची गळती होत आहे. परिणामी या कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा राहत नाही. याशिवाय ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील लेखाधिकारी यांच्या दालनातही पाणी गळती होत असल्याने या अधिकाऱ्याला आपल्या दालनाबाहेर येऊन काम करावे लागत आहे. याकडे प्रशासक यांनी गांभीर्याने लक्ष देऊन दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.