अंजनगाव सुर्जी (अमरावती) : तालुक्यातील घोगर्डा येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुजी चक्क टेबलवर झोपून फोन करीत असल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
या छोट्याशा गावात जिल्हा परिषदेची इयत्ता चौथीपर्यंत शाळा आहे. विद्यार्थ्यांची संख्या अवघी दहा आहे. तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवण्याची आर्थिक परिस्थिती नसणाऱ्यांचीच ही मुले आहेत. शाळेत दोन शिक्षक आहेत. त्यापैकी शिक्षिका रजेवर असताना अन्य शिक्षक २७ जुलै रोजी वर्गखोलीतील एका टेबलवर चक्क झोपून फोन करीत असल्याचा व्हिडीओ एका गावकऱ्याने काढला.
व्हिडीओ काढणारी व्यक्ती अगदी जवळून ‘ओ साहेब’ असा आवाज देते तेव्हा फोनमध्ये गुंग झालेत्या गुरुजींची तंद्री भंग होते. हा व्हिडीओ व्हायरल होताच गटविकास अधिकारी ते गटशिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. तंबी देण्याच्या नावाखाली हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. प्रकरणाची सारवासारव करण्यासाठी गुरुजींनी गावातील काही गावकऱ्यांना पंचायत समितीत आणल्याचीही चर्चा आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी चौकशी व कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले. गटशिक्षणाधिकारी चिखलदरा येथे असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.