अमरावती : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत सलग तीन दिवसांनंतर मंगळवारी (दि.२०) नेहमीप्रमाणे कामकाज सुरू झाले. विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या जागेवर बसून प्रशासकीय कामकाज करत असताना अचानक बत्ती गुल झाली. बांधकाम विभागासह अन्य विभागांत अंधारात बसून कर्मचारी मोबाईलच्या प्रकाशात प्रशासकीय कामकाज करतानाचे चित्र दिसून आले.
सरकारी कार्यालयांना शनिवार आणि रविवारी या नियमित सुट्ट्या व सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.१९) अशा तीन दिवस सरकारी कार्यालयांना टाळे हाेते. त्यामुळे मंगळवारी (दि.२०) मिनी मंत्रालयाचे कामकाज आठवड्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू झाले. त्यामुळे या ठिकाणी विविध विभागांत कामानिमित्त ग्रामीण भागातून अनेक नागरिकांची वर्दळ दिसून आली. यासोबतच कंत्राटदारांची मोठी रेलचेल होती. त्यामुळे विविध विभागांत कामकाज नेहमीप्रमाणे कर्मचारी काम करत असताना जिल्हा परिषद बांधकाम, सामान्य प्रशासन व अन्य काही विभागांतील वीजपुरवठा अचानकच खंडित झाला. त्यामुळे संगणकावर कामकाज करत असलेले कर्मचाऱ्यांचे सुरू असलेले कामकाज बंद पडले तर ऑफलाईन पद्धतीने कामकाज करत असलेल्या कर्मचारी मात्र आपल्या टेबलवर अंधारात बसून मोबाईलच्या प्रकाशात कामकाज करतानाचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे अनेक कर्मचाऱ्यांसमोर काम घेऊन आलेल्या नागरिकांची चक्क तासभर अंधारातच थांबून संबंधित विभागात तळ ठाेकून उभे होते. तासभरानंतर मात्र बांधकामसह अन्य विभागांतील वीजपुरवठा सुरळीत झाला. अन् दुपारी लंचटाईमनंतर पुन्हा ऑनलाईन व ऑफलाईन कामकाज सुरू झाले.