अमरावती : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून ‘माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातून सायकल रॅली काढण्यात आली. सकाळी ८ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरूवात झाली.
‘माझी वसुंधरा अभियानातंर्गत पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने विविध प्रकारचे उपक्रम झेडपीच्या माध्यमातून राबविले जात आहेत. त्याअनुषंगाने ही रॅली झेडपी मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, पंचवटी मार्गे वलगांव येथील संत गाडगेबाबा वृध्दाश्रमात पोहोचली. येथे कर्मचाऱ्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने शपथही घेण्यात आली. त्यानंतर या सायकल रॅलीचा समारोप नांदगावपेठ येथे करण्यात आला. या ठिकाणच्या स्मशानभूमीतही वृक्षारोपण करण्यात आले. या रॅलीत सीईओ अमोल येडगे, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, दिलीप मानकर, ज्ञानेश्र्वर घाटे, पंकज गुल्हाने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.