नवी दिल्ली - भारताची १०२ वर्षांची महिला अॅथ्लिट मन कौर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला स्पेनमध्ये झालेल्या विश्व मास्टर्स ट्रॅक अँड फिल्डमध्ये सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. कधीच पराभव न स्वीकारण्याच्या वृत्तीला जीवनाचे सार मानणाऱ्या या खेळाडूने पुढच्या स्पर्धेसाठी नव्या जोमाने सरावाला सुरुवात केली आहे.ती धावण्याव्यतिरिक्त भालाफेकही करते. पुढे होणाºया स्पर्धेत सहभाग नोंदवत पदक पटकाविण्यासाठी उत्सुक असल्याचे या खेळाडूने म्हटले आहे.मन कौर म्हणाल्या,‘मी आणखी पदके जिंकण्यास इच्छुक आहे. विजयानंतर मला आनंद मिळतो. सरकारतर्फे मला काही मिळाले नाही; पण ते महत्त्वाचे नाही, कारण माझी केवळ धावण्याची इच्छा आहे आणि त्यामुळे आनंद मिळतो.’मन कौरने या महिन्याच्या सुरुवातीला स्पेनमधील मलागामध्ये झालेल्या विश्व मास्टर्स अॅथ्लेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १०० ते १०४ या वयोगटात २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यांनी तेथे भालाफेक स्पर्धेतही सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या त्या एकमेव खेळाडू होत्या, पण चाहत्यांनी त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. त्यांनी वयाच्या १०२ व्या वर्षी २०० मीटर शर्यत पूर्ण केली आणि भालाफेकही केली. आता त्या पुढील वर्षी मार्चमध्ये पोलंडच्या यजमानपदाखाली होणाºया विश्व मास्टर्स अॅथ्लेटिक्स इन्डोरचॅम्पियनशिपसाठी सराव करीत आहे. त्यांचे लक्ष्य ६० मीटर व २०० मीटर शर्यतीत सहभागी होण्याचे आहे.त्यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी धावण्याच्या सरावाला सुरुवात केली आणि गेल्या वर्षी न्यूझीलंडच्या आॅकलंडमध्ये झालेल्या विश्व मास्टर्स स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत पदक पटकावल्यानंतर त्या प्रकाशझोतात आल्या. (वृत्तसंस्था)
अॅथ्लेटिक्समध्ये आणखी पदके जिंकण्याचे १०२ वर्षांच्या मन कौर यांचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 2:17 AM