जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताला हेप्टॉथ्लॉन या खेळात सुवर्णपदक जिंकवून दिले ते स्वप्ना बर्मन. पायाला 12 बोटे असताना आणि खास शूज नसतानाही स्वप्नाने ही देदिप्यमान कामगिरी करून दाखवली. सामान्य शूज घालून खेळल्यावर स्वप्नाला भरपूर त्रास होत होता. पण तरीही तिने जिद्दीने खेळ करत सुवर्णपदक पटकावले. पण आता सुवर्णपदक पटकावल्यावर मात्र स्वप्नाचा हा त्रास कमी होणार आहे.
स्वप्नाच्या दोन्ही पायांना मिळून 12 बोटे आहेत. प्रत्येक पायाला सहा. त्यामुळे शूज घालून खेळताना तिला समस्या जाणवते. तिला काही जणांनी शस्त्रक्रीया करून एक बोट काढण्यासही सांगितले. पण स्वप्नाने ते ऐकले नाही.
सुवर्णपदक पटकावल्यावर आता तिला एक मौल्यवान भेट मिळणार आहे. अशी एक भेट ज्या गोष्टीची स्वप्नाला गरज होती. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीने स्वप्नाच्या कामगिरीची दखल घेतली आहे. या फॅक्टरीने अमेरिकेच्या एका नामांकित शूज बनवणाऱ्या कंपनीला स्वप्नासाठी एक कंत्राट दिले आहे. या कंत्राटानुसार स्वप्नासाठी खास सानुकूलित शूज तयार केले आहेत. तिला ६ जोडी बूट ३-४ दिवसात भेटणार आहे, त्यामुळे पुढे तिला खेळणे सोपे जाईल.
या खेळात अॅथलेटीक्सच्या सात प्रकारांचा समावेश असतो. यामध्ये 200 मी. आणि 800 मी. धावण्याची शर्यत होते. त्याचबरोबर 100 मी. अडथळ्याची शर्यत खेळवली जाते. त्यानंतर उंच उडी. लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेक या प्रकारांचा समावेश असतो. स्वप्नाने या सातही खेळात मिळून 6026 गुण पटकावत सुवर्णपदकाला गवसणी घातली. पण हे पदक पटकावताना तिला अनंत अडचणींचा सामना करावा लागला.
स्वप्नाचे वडिल रिक्षाचालक होते. घरची परिस्थिती बेताची होती. हा खेळ घरच्यांपासून गावातल्या लोकांनाही माहिती नव्हता. त्यामुळे स्वप्ना नेमकी काय करते हे घरच्यांना माहिती नव्हते. त्यामुळे स्वप्ना मेहनत घेत असताना तिला पाठिंबा मिळाला नाही. त्याचबरोबर 2013 सालापासून तिच्या वडिलांना गंभीर आजार झाला होता. तेव्हापासून ते अंथरुणाला खिळून आहेत.