लंडन : ‘वायुवेगाला पर्याय’ असलेला उसेन बोल्ट याच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे २५ खेळाडूंचे पथक सहभागी होत असून, विश्वविक्रमाला गवसणी घालणारा ज्युनियर भालाफेकपटू नीरज चोपडा याच्याकडून पदकाची अपेक्षा बाळगण्यात येत आहे.हरियाणाचा १९ वर्षांचा नीरज १० आणि १२ आॅगस्ट रोजी पात्रता तसेच फायनल खेळणार आहे. १९८३ साली विश्व चॅम्पियनशिप सुरू झाल्यापासून भारत स्पर्धेत सहभागी होत आला आहे. तथापि, २००३ मध्ये लांब उडीतील खेळाडू अंजू बॉबी जॉर्ज हिने जिंकलेल्या कांस्यपदकाचा अपवाद वगळता भारताला फारसे यश मिळाले नाही.विश्व स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाबाबत बराच वाद झाला. १५०० मीटरमध्ये धावणारी पी. यू. चित्रा हिने न्यायालयाचे दार ठोठावले. महिलांच्या २० किमी शर्यतीत सहभागी होणारी खुशबीर कौर, एम. आर. पुवम्मा, जिश्ना मॅथ्यू आणि अनुराघवन यांचा रिले संघ अनुभवी असला तरी अनेक चेहरे नवखे आहेत. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकमेव पदक जिंकले असल्याने, कुणी खेळाडू अंतिम फेरीत पोहोचला तरी मोठी उपलब्धी ठरणार आहे. आशियाई चॅम्पियन गोविंदन लक्ष्मण १० हजार मीटरच्या फायनलमध्ये भाग घेऊ शकणार नाही. भुवनेश्वरमध्ये सुवर्ण जिंकूनही तो या स्पर्धेसाठी पात्र ठरला नव्हता. भारतीय खेळाडूंची पहिली स्पर्धा ५ आॅगस्ट रोजी होईल. स्वप्ना बर्मन हेप्टथलानच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत सहभागी होणार असून, पुरुषांच्या ४०० मीटर हिटमध्ये मोहम्मद अनस धावणार आहे.महिलांच्या ४०० मीटर दौडमध्ये निर्मला शेरॉन प्रतिनिधित्व करेल. पुरुष अडथळा शर्यतीत सिद्धांत थिंगाल्या आशियाई स्पर्धेत पाचव्या स्थानावर होता. त्याच्याकडूनही फारशा आशा नाहीत. पाच हजार मीटरमध्ये लक्ष्मण हा सुरुवातीचा अडथळा पार करेल, असे वाटत नाही. महिला भालाफेकीत अनुराणी ही ६१.८६ मीटरपेक्षा अधिक भालाफेक करू शकली तरी आश्चर्य घडेल. कोटा नियमामुळे अंतिम क्षणी संघात आलेली वेगवान धावपटू दुती चंद ही देखील चांगल्या फॉर्ममध्ये नाही. पुरुषांच्या २० किमी पायी चालण्याच्या शर्यतीत केटी इरफान, देवेंद्रसिंग आणि गणपती कृष्णन यांचा समावेश असेल. टी. गोपी आणि मोनिका आठरे हे मॅरेथॉन धावपटू आहेत. ४ बाय ४०० मीटर रिले संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला तरी मोठी उपलब्धी ठरेल. (वृत्तसंस्था)नीरजने ८५.६३ मी.भालाफेक करीत विश्वविक्रम नोंदविला असल्याने, तो पदकांच्या शर्यतीत राहू शकतो. सध्याचा आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियन थॉमस रोहलेर याने ९० मीटर तसेच अन्य आठ खेळाडंूनी ८७.६४ मी.पर्यंत भालाफेक केली आहे. नीरजला स्वत:ची कामगिरी सुधारण्याचे आव्हान असेल. यंदा त्याने तीनवेळा ८५मी. अंतर गाठले.बर्लिंन येथे २००९मध्ये १०० मी. धावण्याच्या शर्यतीत ९.५८ वेळेची नोंद करून विश्वविक्रम करणाºया जमैकाचा उसेन बोल्ट या स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आॅलिम्पिकमध्ये ८,वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ११,सुवर्ण पदके जिंकणाºया उसेन बोल्टची या स्पर्धेतील शेवटची धाव असेल
भालाफेकपटू नीरजकडून पदकाची आशा, विश्व अॅथलेटिक्स आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:20 AM