नवी दिल्ली - ‘मी ट्रॅकवर उतरते तेव्हा माझे लक्ष पदक जिंकण्यावर नसते, तर टायमिंग सुधारण्यावर असते. टायमिंग सुधारले तर पदक आपोआप मिळेल. पदकासाठी स्वत:वर कधीही दडपण येऊ देत नाही. आधीच्या कामगिरीत कशी सुधारणा होईल, हेच माझे उद्दिष्ट असते,’ असे, आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी १८ वर्षांची धावपटू हिमा दास हिने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले.फिनलँडच्या तम्पारे येथे २० वर्षांखालील विश्वचषकात ४०० मीटरचे सुवर्ण विजेती हिमा दास हिने जकार्ता येथे ४०० मीटर शर्यतीचे रौप्य पटकविलेच शिवाय महिलांच्या चार बाय ४०० मीटरचे सुवर्ण आणि ४०० मीटर मिश्र रिलेमध्ये सुवर्ण मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. हिमाला मंगळवारी अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, सहा महिन्याआधीपर्यंत ४०० मीटर शर्यत ही हिमाची मुख्य स्पर्धा नव्हती. ती म्हणाली, ‘मी टायमिंग सुधारण्यावर भर देते, पदक मिळविण्यावर नव्हे. ’हिमाने फिनलँडमध्ये ५१.४६ सेकंद वेळेसह ४०० मीटर शर्यत जिंकली होती. जकार्ता येथे तिने दोनदा राष्टÑीय विक्रम नोंदवला. तिने हिटमध्ये ५१.०० सेकंद वेळेसह १४ वर्षे जुना मनजीर कौरचा ५१.०५ सेकंदांचा विक्रम मोडला व नंतर मुख्य शर्यतीत ५०.७९ सेकंद वेळेसह स्वत:च्याच कामगिरीत सुधारणा केली. (वृत्तसंस्था)‘इतक्या लवकर अर्जुन पुरस्काराची आशा नव्हती’हिमा म्हणाली, ‘मला एका शर्यतीत रौप्य मिळाले तरी सर्वोत्कृष्ट प्रयत्न केल्याने निराशा झाली नाही. मी सहा महिन्यांपूर्वी ४०० मीटर धावणे सुरू केले. पण आधीपासून याचा प्रयत्न करीत होती. इतक्या लवकर अर्जुन पुरस्कार मिळण्याचा विश्वास नव्हता.’‘या पुरस्काराचा आनंद असून इतक्या कमी वयात हा पुरस्कार मिळाल्यामुळे माझ्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा देखील वाढल्या ओहत. त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल,’ असेही हिमाने यावेळी म्हटले.
मी टायमिंगसाठी धावते, पदकासाठी नव्हे; हिमा दासने व्यक्त केला आत्मविश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 3:57 AM