लंडन : जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील भारतीयांची निराशाजनक कामगिरी कायम राहिली. पदकासाठी भारताचे आशास्थान असलेल्या निर्मला शेरॉन हिला महिलांच्या ४०० मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीत तळाच्या तीन स्थानांमध्ये समाधान मानावे लागले. २२ वर्षीय निर्मलाने ५३.०७ सेकंदाची वेळ नोंदवली. विशेष म्हणजे, निर्मलाची आत्तापर्यंतची सर्वोत्तम वेळ ५१.२८ सेकंदाची असल्याने तिची कामगिरी भारतासाठी अत्यंत निराशाजनक राहिली.निर्मला उपांत्य फेरीच्या दुसºया हीटमध्ये सातव्या स्थानावर राहिली. तसेच, एकूण २४ धावपटूंमध्ये तिला २२व्या स्थानी समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीच्या तिन्ही हीटमध्ये अव्वल दोन स्थानावर राहिलेले धावपटू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. बहारीनची सल्वाईद नासिर ५०.०८ सेकंदाच्या वेळेसह अव्वल राहिली. तसेच, गतविजेती आणि रिओ आॅलिम्पिक रौप्य विजेती एलिसन फेलिक्स दुसºया स्थानी राहिली. (वृत्तसंस्था)माझी कामगिरी चांगली झाली नाही. मंगळवारी मी चांगली कामगिरी केली होती. परंतु, त्यानंतर मी सातत्य राखण्यात अपयशी ठरली. येथील जेवण चांगल्या दर्जाचे नाही आणि माझ्याकडे वैयक्तिक प्रशिक्षकही नाही.- निर्मला शेरॉनहरियाणाच्या निर्मलाला आपली सर्वोत्तम वेळ नोंदवण्यात जरी यश आले असते, तरी तिला अंतिम फेरीसाठी संधी मिळाली असती. हीटमध्ये निर्मलाने ५२.०१ सेकंदाची वेळ नोंदवली होती, परंतु या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यातही तिला अपयश आले होते. गत महिन्यात झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत याच वेळेच्या जोरावर निर्मलाने सुवर्ण पटकावले होते.कंबर दुखापतीनंतरही शर्यत पूर्ण केली : स्वप्नामहिलांच्या हेप्टाथलॉनमध्ये २६व्या स्थानी समाधान मानावे लागलेल्या स्वप्ना बर्मनने आपल्या अपयशाचे कारण कंबर दुखापत असल्याचे सांगितले. हेप्टाथलॉनमध्ये पहिली स्पर्धा १०० मीटर अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर अनेकवेळा कंबर दुखापतीने बेजार झाल्याचे स्वप्नाने म्हटले. हेप्टाथलॉनमध्ये स्वप्नाला २७ धावपटूंमधून २६व्या स्थानी समाधान मानावे लागले.स्वप्नाने सांगितले की, ‘२०१४ साली आशियाई स्पर्धांमध्ये मला सर्वप्रथम कंबर दुखापत झाली. त्यानंतर २०१६ पर्यंत ही दुखापत कायम राहिली. त्यामुळे मी अधिक सराव करु शकली नाही. फेब्रुवारी २०१७ पासून सराव सुरु केल्यानंतर मी भुवनेश्वरमध्ये आशियाई स्पर्धा खेळून आणि जागतिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. येथे १०० मीटर शर्यतीनंतर पुन्हा दुखापतीने डोके वर काढल्याने मी माझ्या प्रशिक्षकांशी बोलून स्पर्धेतून माघार घेण्याबाबत चर्चा केली. मात्र, त्यांनी कसेही करुन स्पर्धा पुर्ण करण्यास सांगितले.’
भारतीयांची निराशाजनक कामगिरी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 2:46 AM