आॅस्ट्रावा (झेक प्रजासत्ताक) : भारताचा स्टार अॅथलिट अरपिंदर सिंग याने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करताना आयएएएफ कॉन्टिनेंटल चषक स्पर्धेत रविवारी तिहेरी उडीमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. विशेष म्हणजे या स्पर्धेत पदक जिंकणारा अरपिंदर पहिला भारतीय खेळाडू ठरला.नुकताच झालेल्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत अरपिंदरने आपल्या पहिल्याच प्रयत्नात १६.५९ मीटरची उडी घेतली. यानंतरच्या दोन प्रयत्नांमध्ये त्याला प्रत्येकी १६.३३ मीटर इतकीच झेप घेता आली. यामुळे त्याला दोन अॅथलिटच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यापासून मुकावे लागले. मात्र, असे असले तरी त्याने कांस्य पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वर्षातून एकदाच होणाऱ्या या प्रतिष्ठीत स्पर्धेमध्ये अरपिंदर आशिया पॅसिफिक संघाचे प्रतिनिधित्त्व करत होता. अरपिंदरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी १७.१७ मीटर अशी असून जकार्ता येथे आशियाई स्पर्धेत त्याने १६.७७ मीटरची उडी घेतली होती.स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकल्यास, आतापर्यंत कोणत्याही भारतीयाला या स्पर्धेत पदक मिळवणे शक्य झाले नव्हते. मात्र अरपिंदरने हे अपयश धुवून काढले. २०१० सालाच्या आधी या स्पर्धेकडे आयएएएफ विश्वचषक स्पर्धा असे ओळखले जात असे.दरम्यान, अरपिंदरने कांस्य पटकावले असले, तरी त्याला या स्पर्धेत तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागले. अमेरिकेचा विद्यमान आॅलिम्पिक आणि जागतिक विजेता ख्रिस्टियन टेलर याने १७.५९ मीटरची झेप घेत सुवर्ण पटकावले. त्याचवेळी, बुर्किन फासोच्या ह्यूज फॅब्राइज याने १७.०२ मीटरची उडी घेत रौप्य पटकावले. (वृत्तसंस्था)
भारताच्या अरपिंदर सिंगची ऐतिहासिक भरारी, काँटिनेंटल स्पर्धेत जिंकले कांस्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 8:15 PM