- सचिन कोरडे उसैन बोल्ट. वेगाशी स्पर्धा करणारा हा माणूस. वा-यासारखा चपळ. एकदा का सुसाट निघाला तर लक्ष्य ‘हासील’ करणारच. बोल्टला जितक्या उपमा द्याव्या तितक्या कमीच. कदाचित, त्याला आपल्या क्षमतेची जाणीव नसावी, आणि म्हणूनच त्याने २००४ मध्ये अथेन्स आॅलिम्पिक स्पर्धेत केवळ ४ बाय १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतच भाग घेतला होता. (नाहीतर सगळी पदके त्याच्याच गळ्यात असती). तो तर क्रिकेटर बनायला निघाला होता. गुणवत्तेची खरी पारख असलेल्यांची नजर बोल्टवर पडली आणि त्याचा ‘सुसाट’ मार्गच बदलला. त्याने स्वत: काही अशक्य गोष्टींवर मेहनत घेतली आणि १००, २०० आणि १०० बाय ४०० मीटर शर्यतीचे कीर्तिमान स्थापित केले. जे आता भावी पिढीलाही मोडणे अशक्यप्राय असेल. बोल्ट अवघ्या ३० वर्षांचा. या वर्षांत इतकीच वर्षे मिळवली तर कुणीही कोणत्याही क्षेत्रातून निवृत्त होईल, नाही का? पण बोल्टने तर ३०व्या वर्षीच निवृत्ती घेतली; कारण तेवढे कार्य त्याने ३०व्या वर्षीच करून ठेवलेय. त्याचा हा ‘कारनामा’ शेकडो वर्षे स्मरणात राहील. जमैकाच्या मातीतलं हे ‘काळं सोनं’ नेहमीच तेजस्वीपणे चमकत राहील. बोल्टच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकण्याचा हा प्रयत्न...उसैन वेस्ले जेनिफर बोल्ट हे त्याचे पूर्ण नाव. वेस्ले हे वडिलांचे तर जेनिफर आईचे नााव. आई-वडिलांची नावे सर्वज्ञात न झाल्याने बोल्टला दु:ख आहे. कारण, या दोघांच्याही नावाला इतिहास आहे. खेळाच्या दुनियेत वेस्ले या नावाचा विचार केला तर डोळ्यासमोर वेस्ले हॉल हे नाव येते. जे वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटर होते. ‘आग ओकी’ गोलंदाजीसाठी ते प्रख्यात होते. त्यांची भेदक गोलंदाजी फलंदाजांना ‘नाकीनऊ’ आणायची. महिलांमध्ये जेनिफर कॅप्रियाती ही लॉन टेनिसपटू; पण खेळापेक्षा एक सौंदर्यवती म्हणूनच ती अधिक प्रसिद्ध झाली होती आणि म्हणूनच की काय, त्यावेळचा भारताचा सुपरस्टार क्रिकेटर रवी शास्त्री हा सुद्धा तिच्याकडे आकर्षित झाला होता. शास्त्रींनी तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली होती. कॅप्रियतीने मात्र ‘कोण शास्त्री, कोण रवी’ असे म्हणत शास्त्रींच्या स्वप्नावर पाणी फेरले होते. त्यानंतर शास्त्री यांनी पुन्हा तिचे नाव घेतले नाही. सांगायचे काय, तर हे दोन्ही नावे एवढी प्रसिद्ध झाली असली तरी बोल्टच्या आई-वडिलांची त्यांच्यासमानच असलेली नावे मात्र दुर्लक्षितच राहिली. खेळाच्या दुनियेत चाहत्यांना माईक टायसनपासून मायकल फेल्प्स, टायगर वूडपासून मायकल जॉन्सन, मॅराडोनापासून क्रिस्तियानो रोनाल्डोपर्यंत त्यांच्या आई-वडिलांची नावे माहीत नाहीत. कारण महाराष्ट्रीयन लोक दक्षिण भारतीय लोकांप्रमाणे आपल्या वडिलांचे नाव आपल्या नावसोबतच लिहितात. त्यामुळे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे वडील प्रा. रमेश तेंडुलकर यांचे नावे प्रसिद्ध झाले आहे. जसे सुनील मनोहर गावसकर किंवा दिलीप बळवंत वेंगसरकर. सचिनच्या आईचे नाव रजनी हे त्याच्या ब-याच चाहत्यांच्या तोंडी आहे. या मातेचे नाव माहीत असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण एका लाकडी फळीपासून १०० शतकांचा विक्रम रचण्याची किमया तिच्या मुलाने (सचिन) केली. असे पराक्रम कधीतरीच मोहल्ला किंवा गल्ली क्रिकेटमध्ये घडतात. क्रिकेटच्या बाबतीत कॅरेबियन आजही मागे आहेत. म्हणून अॅथलेटिक्स, बास्केटबॉल आणि फुटबॉल या खेळांना ते प्राधान्य देतात. क्रिकेटला सापत्नभावाची वागणूक दिल्यानेच कॅरेबियन बोर्ड आणि क्रिकेटपटूंमधील वाद चव्हाट्यावर आल्याचेही आपण ऐकले असेल. बरेच क्रिकेटपटू कंगाल झाले आहेत. म्हणूच ख्रिस गेलसारखा खेळाडू देशासाठी खेळायचे सोडून स्वत:ला विकत टी-२० लीग खेळतोय. गुणवत्तेच्या आधारावर ख्रिस गेलने यशस्वी मजल मारली. जमैकाचे नाव सर्वदूर नेले आणि म्हणूनच तो ‘मोस्ट वॉण्डेट’ क्रिकेटर आहे.जमैकाच्या ट्रीलेवने पॅरीश टाउनजवळ दोन गाव आहेत. शेरवूड आणि कॉन्टेंट. या गावांना आता जग ओळखायला लागलेय; कारण हेच बोल्टचे गाव. आश्चर्य वाटेल.. बोल्टने येथे गरिबांसाठी हजारो घरेही बांधून दिली आहेत. स्वत: गरिबीतून वर आलेल्या बोल्टने केलेले हे सामाजिक कार्य ठरावीक लोकांनाच माहीत असेल.आई-वडिलांमुळेच घडलो. पोटाची खळगी भरत त्यांनी मोठं केलं. आता माझ्यासारख्या गरिबांना हक्काचं घर बांधून दिल्याने खूप समाधान वाटतं, असे बोल्टने एका मुलाखतीत सांगितले होते.क्रिकेटपटू बनू पाहणा-या बोल्टला ग्लेन मिल्स या गुरूने ‘ट्रॅक’वर आणले. कारकिर्दीची सुरुवात २०० मीटर शर्यतीने केलेला बोल्ट अथेन्स आॅलिम्पिकनंतर १०० मीटर शर्यतीत उतरला. या वेळी त्याला मिल्स यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. मिल्स यांनी त्याला ४०० मीटर धावण्याचाही सल्ला दिला. गुरू हे शिष्याला मंत्र देण्यापूर्वी त्याची परीक्षा घेतात. पारख करतात. बोल्टच्या बाबतीतही हेच घडले. या ‘ब्लॅक गोल्ड’नेजेव्हा ट्रॅकवर पाय ठेवला तेव्हा १०० मीटर शर्यतीत ९.७७ सेकंद ही सर्वाेत्तम वेळ होती. अमेरिकेच्या जस्टीन गेटलीनने एकदा ही वेळ नोंदवली होता. त्यानंतर जमैकाच्याच असाफा पॉवेल याने ही वेळ तीनदा गाठून ९.७४ सेकंदांची नवी वेळ नोंदवली होती.हा विक्रम मोडण्यासाठी आता ‘अवतारा’ची गरज भासेल असे वाटत होते.तेव्हा बोल्टच्या लक्षात आले की ही एक स्पर्धा आहे. त्याच्या गुरूचा कानमंत्र त्याच्या ध्यानात आला. आपल्याला चित्त्याप्रमाणेच धावावे लागेल, असे ठरवून त्याने घाम गाळला. उसैन बोल्ट, लियो बोल्ट, ओजे, लाईटनिंग अशा कितीतरी नावांनी ओळखल्या जाणा-या बोल्टने ३१ मे २००८ रोजी ९.७२ची वेळ नोंदवत पॉवेलचा विक्रम मोडला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर केवळ दीड महिन्यात त्याने ९.६९ सेकंदांची वेळ नोंदवली. जी अशक्यप्राय होती. पण तो बोल्ट. विक्रमादित्य. धावण्यासाठीच जन्माला आलेला, थांबणार कसा? १६ आॅगस्ट २००९ रोजी बर्लिन येथे १०० मीटर शर्यतीतील ९.५८ अशी अजरामर वेळेची नोंद त्याने केली.खरंच, एक स्वप्न पूर्ण व्हावं यासारखंच घडून आलं होतं. सचिन तेंडुलकरसोबत प्रो. रमेश आणि रजनी यांची नावे आपल्या स्मरणातून जातील? नाही ना. मग उसेन वेस्ले जेनिफर बोल्ट.. हे नावसुद्धा लोकांनी आठवणीत ठेवायला हवे.आश्चर्यकारक, पण खरे...आश्चर्यकारक आहे; पण खरे आहे. या जमिनीवर १०० मीटर पुरुषांची धावण्याची शर्यत सुरु झाली तेव्हापासून १३ वर्षांपर्यंत १०.८ सेकंद हीच सर्वाेत्तम वेळ होती. त्याच्यापुढे कुणालाही जाता येत नव्हते. अमेरिकेच्या लुथर कॅरीने ४ जुलै १८९१ रोजी ही सर्वाेत्तम वेळ नोंदवली. तसेच सिसिल ली याने २५ आक्टोबर १८९२ रोजी ब्रुसेल्स येथे, बेल्जियमच्या एटीने डी रे याने ४ आॅगस्ट १८९३ रोजी ब्रुसेल्स येथे, युनायटेड किंगडमच्या एल एटचेर्ली याने १३ एप्रिल १८९५ रोजी फ्रॅँकफर्ट येथे, युकेच्या हॅरी बिटन याने २८ आॅगस्ट १८९५ रोजी १०.८ सेकंदांची वेळ देत शर्यत पूर्ण केली होती. स्वीडनच्या हेराल्ड अॅँडरसन अर्बिन याने ९ आॅगस्ट १८९६ रोजी आणि त्याच देशाच्या इसाक वेस्टरग्रीनने ११ सप्टेंबर १८९८ रोजी गावले येथे हीच वेळ नोंदवली होती. हा सिलसिला १९०६ पर्यंत सुरू होता. अखेर स्वीडनच्या क्नूट लिंडबर्गने २६ आॅगस्ट १९०६ रोजी गोटेनबर्ग येथे या वेळेत सुधारणा करीत १०.६ सेकंद अशी नवी वेळ नोंदवली. हा विक्रम सहा वर्षांनंतर मोडला गेला. रिचर्ड राउने १२ मे १९१२ रोजी या विक्रमाची बरोबरी साधली आणि त्याच देशाच्या एरविन केर्न याने २६ जुलै रोजी म्युनिच येथे विक्रमाची बरोबरी साधत नवा विक्रमवीर बनला.बेस्ट आॅफ बोल्ट...१०० मीटर- २००७ मध्ये १०.३ सेकंद- २००८ मध्ये ९.६९ सेकंद- २००९ मध्ये ९.५८ सेकंद- २०१० मध्ये ९.८२ सेकंद- २०११ मध्ये ९.७६ सेकंद- २०१२ मध्ये ९.६३ सेकंद- २०१३ मध्ये ९.७७ सेकंद- २०१४ मध्ये ९.९८ सेकंद- २०१५ मध्ये ९.७९ सेकंद- २०१६ मध्ये ९.८० सेकंद
जमैकन मातीतलं ‘काळं सोनं’!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2017 10:33 PM