कोल्हापूर : अमेरिकेत सुरू असलेल्या वर्ल्ड पोलीस - फायर चॅम्पियनशिपमध्ये कोल्हापूरच्या जयश्री बोरगी हिने सुवर्ण हॅट्ट्रिक साधली. त्याचबरोबर कोल्हापूरचा जलतरणपटू मंदार दिवसे यानेही दोन सुवर्ण आणि एक रौप्य अशा तीन पदकांची कमाई केली.लॉस एंजिल्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत बुधवारी जयश्री बोरगी हिने ५ किलोमीटर चालणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यात भर घालत गुरुवारी झालेल्या १५०० व ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये जयश्रीने पुन्हा सुवर्णमय कामगिरी करत आणखी दोन सुवर्णपदके पटकाविली. त्यामुळे तिच्या खात्यात एकूण ३ सुवर्णपदके झाली आहेत.कोल्हापूरचाच आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व सीमा सुरक्षा दलात अधिकारी असणाºया मंदार दिवसे याने दोन सुवर्ण आणि एक रौप्य, अशा तीन पदकांची कमाई केली आहे. त्याने खुल्या जलतरण स्पर्धेत एक, तर ४०० मीटर फ्री स्टाईलमध्ये एक सुवर्ण, अशी दोन सुवर्णपदके , तर ५० बाय ४ रिले मध्ये सांघिक गटात एका रौप्यपदकाची कमाई केली. मुंबई पोलीस दलाची सोनिया मोकल हिने याच प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली, तर पुणे पोलीस दलाच्या रवींद्र जगतापने फ्री स्टाईल ७० किलोगटांत सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे एकूणच महाराष्ट्राच्या खेळाडूंचा या स्पर्धेत वरचष्मा राहिला.कोल्हापूर, पुणे आणि मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वातावरणामध्ये सराव केल्याचा फायदा मिळाला. तसेच खेळाडूंना स्पर्धेआधी मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही देण्यात आले. आमच्या तिन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पटकावले होते आणि पहिल्यांदाच महाराष्ट्राचे तीन खेळाडू जागतिक पोलिस स्पर्धेत सहभागी झाले. त्यांनी केलेल्या सुवर्ण कामगिरीचा आम्हाला अभिमान असून यामुळे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब यांच्या पंक्तीत येईल. पदकविजेते खेळाडूंच्या पदोन्नोतीसाठी आम्ही नक्कीच वरिष्ठांपुढे प्रस्ताव सादर करु.- बाजीराव कलंत्रे, मुंबई शहर क्रीडा अधीक्षक
जयश्री बोरगीची सोनेरी हॅट्ट्रिक, जागतिक पोलीस-फायर क्रीडा स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 1:41 AM