नवी दिल्ली : सेखोम मीराबाई चानू आणि संजीता चानू यांनी आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल सिनियर भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी आपापल्या गटात सुवर्ण पदके जिंकून पुढील वर्षी आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची पात्रता मिळविली आहे.मीराबाईने स्रॅचमध्ये ८५ किलो तसेच क्लीन अॅन्ड जर्क प्रकारात १०४ किलो असे एकूण १८९ किलो वजन उचलून ४८ किलो वजन गटात सुवर्ण पदकाची कमाई केली. दरम्यान तिने स्रॅच प्रकारात नवा राष्ट्रकुल विक्रम देखील नोंदविला. ८५ किलो वजन उचलताच तिने एक किलो अधिक वजन उचलण्यासह स्वत:चा आधीचा ८४ किलोचा विक्रम मोडीत काढला.संजीताने महिलांच्या ५३ किलो वजन गटात स्रॅचमध्ये ८५ तसेच क्लन अॅन्ड जर्कमध्ये ११० असे एकूण १९५किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजनदेखील पुढील वर्षी गोल्ड कोस्ट येथेच होणार आहे. एम. संतोषीने स्रॅच प्रकारात ८६ तसेच क्लीन अॅन्ड जर्कमध्ये १०८ असे एकूण १९४ किलो वजन उचलून दुसरे स्थान घेतले. पुरुषांच्या ५६ किलो वजन गटात गुरुराजा याने २४६ किलो(१०७ आणि १३९) वजन उचलून कांस्य पदक जिंकले.ज्युनियर गटात अनन्या पाटील आणि जेरेमी लालनिरुंगा यांनी भारतासाठी सुवर्ण पदके जिंकली. या दोघांनी युवा आणि ज्युनियर अशा दोन्ही गटात सुवर्णमय कामगिरी केली. अनन्याने ५३ किलो गटात एकूण १४६ किलो(६६ आणि ८० किलो) वजन उचलले. जेरेमीने पुरुष गटाच्या ५६ किलो वजन प्रकारात एकूण २४० किलो (१०९ तसेच १३१ किलो) वजन उचलण्याची कामगिरी केली. झिली दलाबेहडाने ४५ किलो महिला गटात एकूण १५४ किलो वजन उचलण्याची कामगिरी करीत सुवर्ण पटकविले.स्नेहा सोरेनने मुलींच्या ४८ किलो गटात १३८ किलो वजन उचलून अव्वल स्थान घेतले. जखुमा याने मुलांच्या ५६ किलो युवा गटात एकूण २१५ किलो वजन उचलण्याची किमया साधली पण त्याला रौप्यावर समाधान मानावे लागले.(वृत्तसंस्था)
मीराबाई चानू, संजीता राष्ट्रकुल भारोत्तोलन स्पर्धेसाठी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 12:32 AM