औरंगाबाद : जयभवानीनगर, सिडको एन-६ भागात पावसाच्या प्रवाहाने दोन बळी घेतल्यानंतरही महापालिका कुंभकर्णी झोपेतच आहे. पळशी, पिसादेवी भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने आलेला पूर नारेगावातील अजीज कॉलनी, बिस्मिल्ला कॉलनीत घुसल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. सुखना नदीच्या पात्रात अनेक अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे पुरानेही गावावर अतिक्रमण केल्याची परिस्थिती निर्माण केली. पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी पुढाकार घेत मध्यरात्रीच नाला दोन ठिकाणी फोडल्याने पाण्याचा जोर पहाटे ओसरला.
२१ जूनच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर अजीज कॉलनी आणि आसपासच्या विविध वसाहतींत धोक्याची घंटा वाजली होती. पहिल्याच मोठ्या पावसामुळे या भागात पाणीच पाणी झाले होते. महापालिकेने या घटनेचे गांभीर्य ओळखले नाही. नगरसेवक गोकुळ मलके यांनी प्रशानाला वारंवार सांगून, पत्रव्यहार करूनही काहीच उपयोग झाला नाही. शनिवारी रात्री नारेगाव भागात रिमझिम पाऊस येऊन गेला. त्यानंतर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास नागरिकांनी नगरसेवक मलके यांना फोन केला की, अजीज कॉलनीत जास्त पाणी शिरले. मलके घराबाहेर येऊन पाहतात, तर थेंबभरही पाऊस नव्हता.
नागरिक खोटे तर बोलणार नाहीत, म्हणून ते नारेगाव मनपा शाळेजवळ पोहोचले. या भागातील सिमेंट रोडवरच तीन फुटांपेक्षा जास्त पाणी साचले होते. गावात जिकडेतिकडे पुरसदृश परिस्थिती होती. प्रत्येक घरातून किंकाळ्या, वाचवा वाचवा, इकडून तिकडे धावपळ सुरू होती. हे दृश्य पाहून नगरसेवक हादरले. दीड हजाराहून अधिक घरांमध्ये पुराचे पाणी गेले होते. एवढे मोठे पाणी काढायचे कसे, हे कोणालाही उमजत नव्हते.
पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणेनारेगाव पंचक्रोशील सर्वात मोठी नदी म्हणजे सुखना होय. या नदीचे पात्र खूप मोठे आहे. मागील काही वर्षांत नदीपात्रात असंख्य अतिक्रमणे करण्यात आली आहेत. पूर्वी नदीचे पात्र ५० ते ६० फूट रुंद होते. आता नारेगावच्या मुख्य रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला नदीपात्र अवघे ७ ते ८ फूट उरले आहे. पात्रातून पाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेने मोठ-मोठे सिमेंट पाईप टाकले आहेत. या पाईपमध्ये केरकचरा साचल्याने थेंबभर पाणीही पुढे जाऊ शकत नाही. शनिवारी रात्री पिसादेवी, पळशी भागात झालेल्या मोठ्या पावसानंतर पाण्याचा प्रवाह नारेगावात घुसला.
पहाटे पाणी ओसरलेसिडको वॉर्ड कार्यालयाने मध्यरात्री एक जेसीबी उपलब्ध करून दिला. त्यामुळे नारेगावात दोन ठिकाणी नाला फोडण्यात आला. त्यामुळे पहाटे ३ वाजेच्या सुमारास पाणी ओसरले. तब्बल पाच ते सहा तास पाण्याने नारेगावात हाहाकार उडविला होता. या भागातील छोट्या-छोट्या गल्ल्यांमध्ये तीन ते चार फुटांपर्यंत पाणी होते; परंतु सुदैवाने कोणी वाहून गेले नाही. पळशीहून आलेल्या पुरात आणखी थोडीशीही वाढ झाली असती, तर नारेगावात अनेक नागरिकांच्या जिवावर बेतले असते.
भूमाफियांनी नालेही सोडले नाहीतजुन्या शहरातील अनेक गोरगरीब नागरिकांनी आपले घर विकून नारेगाव पंचक्रोशीत आश्रय घेतला आहे. या भागातील ९९ टक्केYप्लॉटिंग अनधिकृत असून, अतिक्रमणेही झाली आहेत. भूमाफियांनी नाल्यांमध्येही प्लॉटिंग करून विक्री केली आहे. नारेगाव येथील मुख्य नदीत किमान २० घरे पाण्याचा प्रवाह अडवत आहेत. ही अतिक्रमणे न काढल्यास भविष्य काळात आणखी मोठा अनर्थ होऊ शकतो.
आणीबाणी पथक कागदावरचपावसाळ्यात शहरात कुठेही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास झोननिहाय आणीबाणी पथक घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना मदत करील, असा आदेश ४८ तासांपूर्वीच दस्तूरखुद्द मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी काढला होता. या आदेशाची शनिवारी अंमलबजावणीच झाली नसल्याची धक्कादायक बाब नारेगाव येथील घटनेमुळे उघडकीस आली. वॉर्ड कार्यालयात असे कोणतेच पथक नसल्याचे लक्षात आल्यावर वॉर्ड अभियंत्याला विनंती करून जेसीबी मागविण्यात आला. तोपर्यंत अग्निशमन विभागाचा ताफाही दाखल झाला होता.
संसाराची राखरांगोळीशनिवारी रात्री अजीज कॉलनी, बिस्मिल्ला कॉलनी आदी भागांत शिरलेल्या पाण्याने गोरगरिबांच्या संसारांची राखरांगोळी झाली. पत्र्याची घरे, कच्ची घरे जमीनदोस्त झाली. संसारोपयोगी अनेक वस्तू पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. रविवारी सकाळी अनेक नागरिक आपली घरे सावरताना दिसून आले.
महापौर, आयुक्त आज पाहणी करणाररविवारी शहर अभियंता एस.डी. पानझडे, वॉर्ड अधिकारी खरपे, माजी सभापती राजू शिंदे यांनी पाहणी केली. सोमवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डॉ. निपुण विनायक नारेगाव भागात पाहणी करणार आहेत. या भागातील नाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी कसा सोडविता येईल, यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.