- सचिन कोरडेवय वर्षे अवघी १५. पूर्व महाराष्ट्रातील आदिवासी भागातील मुलगी. वडील शेतमजूर. खेळासाठी वातारण तर नाहीच. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत महाराष्ट्राच्या ताई बामणे या मुलीने खेलो इंडियात ८०० मीटर मुलींच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले. आज हीच मुलगी महाराष्ट्राची शान बनली आहे. आता तिच्याकडे आॅलिम्पिकमधील भवितव्य म्हणून पाहिले जात आहे. ताई हिच्या सुसाट धावण्याचा गुण टिपला तो प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी. विजेंदर सिंग जे गेल्या शुक्रवारी (दि. २) जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आत्मविश्वास आणि थोडसे बिथरलेले वाटत होते. ताई बामणे धावत होती. पोडियमपासून दूर उभे असलेले विजेंदर मात्र कुणाशी बोलत नव्हते. तिची शर्यत पूर्ण होईपर्यंत विजेंदरच्या नजरा केवळ ताईवरच होत्या. चेहºयावर खेळाडूंना उत्साहित करणा-या भावनाही ते आणत नव्हते. ताई जिंकणार असे त्यांना वाटत होते. पण जिंकेपर्यंत त्याची देहबोली अत्यंत शांत होती. केरळची प्रिन्सीला डॅनियल आणि सँड्रा एएस या दोन्ही धावपटूंचे आव्हान ताईपुढे होते. ताईच्या तुलनेत या दोघींची देहरचना धष्टपुष्ट होती. त्यामुळे ती स्वत:ला कशी सिद्ध करणार, याची चिंताही त्यांना वाटत होती. ताई मात्र आत्मविश्वासाने ट्रॅकवर उतरली होती. ती बिनधास्त धावली. श्वास टिकवून ठेवत शेवटच्या क्षणी तिने सुवर्ण क्षणावर पाय ठेवला. तेव्हा कुठे विजेंदरच्या चेह-यावर हास्य फुलले. ८०० मीटरच्या शर्यतीसाठी २:१३:३७ अशी वेळ देत ताईने महाराष्ट्राला खेलो इंडियाया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले.
गेल्या अर्धदशकापासून विीजेंदर सिंग हे देशातील टॅलेंटचा शोेध घेत आहेत. देशात होणा-या मॅरेथॉन स्पर्धेवर ते नजर ठेऊन असायचे. त्यांनी कविता राऊत, संजीवनी जाधव, रणजित पटेल, किसन तडवी अशा खेळाडूंना मॅरेथॉन स्पर्धेतून निवडले आणि त्यांना मार्गदर्शन करीत आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवले. ग्रासरूट पातळीवर खरे टॅलेंट असून त्याचा शोध घेण्याची गरज आहे, असे विजेंदर सांगतात. जेव्हा कविताला अर्जुन पुरस्कार मिळाला तेव्हापासून मला लोक द्रोणाचार्य संबोधतात. मी कधीही पुरस्काराचा विचार केला नाही पण जेव्हा माझे चॅम्पियन खेळाडू ट्रॅकवर धावतात तेव्हा खूप अभिमान वाटतो. विजेंदर हे मुझफ्फनगर (उत्तरप्रदेश) येथील असून ते सध्या नाशिक येथे राहतात.ते म्हणतात, नाशिक हे समुद्रसपाटीपासून ७०० मीटर उंच आहे. अशा वातावरण आणि स्थितीचा फायदा लांब पल्ल्याच्या धावपटूंना होतो. अंत्यत हालाखीच्या परिस्थितीतील धावपटूंना मात्र खूप संघर्ष करावा लागतो. काही मुली आजही रोज २० ते ३० लीटर पाणी डोक्यावर घेऊन चालतात. यातून १५ किमी अंतरराच्या चांगल्या धावपटू तयार होतात. मी यातून सकारात्मकपणे पाहतो आणि म्हणूनच आज माझ्याकडे महाराष्ट्रातील दुर्गम भागातील २० खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. आम्ही याकडे व्यावसायिकांचे लक्ष वेधले. काही डॉक्टरांची आम्हाला मदत मिळत आहेत.
क्रॉस कंट्रीतून ताईचा शोध..
विजेंदर यांचीच शिष्य असलेल्या नाशिकच्या कविता राऊत हिने क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित केली होती. त्यात दलपतपूर येथील ताई हिने बाजी मारली. शाळेतील स्पर्धेत तार्ईच पुढे असायची. पण मोठ्या पातळीवरील ती पहिल्यांदाच धावली होती. त्यामुळे तिच्या शारीरिक शिक्षकांनी तिला नाशिक येथे प्रशिक्षणासाठी विजेंदर यांच्याकडे पाठवले. ताई ही कोणत्या शर्यतीत फिट बसेल हे आम्हाला आजही माहीत नाही. पण तिच्यातील आत्मविश्वास इतका प्रचंड आहे की ती स्पर्धा नक्की जिंकेल असे नेहमी वाटते. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर या मुलीने ८०० मीटरची शर्यत जिंकून ते सिद्ध करुन दाखवले. भविष्यात ही मुलगी आॅलिम्पिक स्पर्धेत चमक दाखवेल, असा विश्वास विजेंदर व्यक्त करतात.