नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेतील ४०० मीटरचे सुवर्ण विजेती धावपटू प्रियांका पवार हिला प्रतिबंधित उत्तेजक सेवनात दोषी आढळताच आठ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे तिची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. २९ वर्षांच्या प्रियांकाविरुद्ध राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीच्या (नाडा) शिस्तपालन समितीने ही शिक्षा सुनावली.मागच्या वर्षी प्रियांकाच्या नमुन्याचे निकाल आले होते. त्याआधारे नाडा पॅनलने हा निर्णय दिला. नाडाप्रमुख नवीन अग्रवाल म्हणाले, ‘प्रियांकाला जुलै २०१६ पासून आठ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रियांकाच्या नमुन्यात ‘मेफेनटेरमाईन’ हे उत्तेजक आढळून आले होते.नाडाच्या संहितेनुसार एखादा खेळाडू दुसºयांदा उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यास त्या खेळाडूला जास्तीत जास्त आठ वर्षांसाठी निलंबित करण्याची तरतूद आहे. याआधी २०११ मध्ये झालेल्या डोप चाचणीत प्रियांका अन्यपाच धावपटूंसोबत अॅनाबोलिक स्टेरॉईड सेवनात दोषी आढळताचदोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.२०१४ साली झालेल्या इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेमधील महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिलेचे सुवर्ण पदक विजेत्या भारतीय संघाची प्रियांका सदस्य राहिली आहे. मागच्या वर्षी ती आंतरराज्य अॅथलेटिक्स स्पर्धेदरम्यान प्रतिबंधित उत्तेजक सेवनात दोषी आढळली होती. (वृत्तसंस्था)
प्रियांका पवार आठ वर्षांसाठी निलंबित, डोपिंगमध्ये आढळली पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 1:11 AM