किराणा दुकानात बसणं, फावल्या वेळात क्रिकेट एके क्रिकेट खेळणं. आयुष्याचं ध्येय काय? तर वकार युनुससारखी बॉलिंग जमायला हवी. पाकिस्तान ही त्याची फेव्हरिट क्रिकेट टीम. अन् फास्ट बॉलर व्हायचं स्वप्न. सचिन तेंडुलकर अन् ख्रिस गेल हे दोघं आवडते क्रिकेटपटू. गल्लीतल्या क्रिकेट टीममध्ये तो तिस-या क्रमांकावर खेळायचा अन् फास्ट बॉलिंग करायचा.
फुटबॉलही त्याचा जीव की प्राण. आजही त्याला कोणी जर फुटबॉलची ऑफर केली तर तो नाही म्हणू शकणार नाही. पण तो बनला धावपटू. सगळ्या आवडी बाजूला ठेवून वेगळ्याच क्षेत्रात करीअर घडवलं. तेही इतक्या टोकाचं की तो जगातला सर्वांत वेगवान धावपटू बनला. हा धावपटू म्हणजे नेहमी नवे विक्रम प्रस्थापित करणारा जमैकाचा उसैन बोल्ट. बोल्टनं आपण निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलंय. येत्या काही दिवसांत तो थांबलेला असेल.
बोल्टचा जन्मला तो प्रदेश जंगलाचा शेरवूड कंटेंट हे त्याचं जुळं शहर. त्याला एक बहीण अन् एक भाऊ त्याच्या वडिलांचे ग्रामीण भागात छोटं किराणा दुकान होतं. बोल्टला क्रिकेटची जास्त आवड होती़ सचिन तेंडुलकर, ख्रिस गेलचा तो चाहता होता आणि वकार युनुससारखी बॉलिंग त्याला करायची होती. पण ज्या शाळेत तो गेला तिथं त्याला धावण्याची संधी मिळाली आणि तो त्यात पहिला आला. करीअरला कलाटनी मिळण्यासाठी एवढी स्पर्धा पुरेशी ठरली.
त्यानंतर तो कधीच थांबला नाही. त्याचा सरावर एवढा अवघड असतो की सर्वसामान्याने तो करूच नये. तो जेव्हा धावतो तेव्हाच त्याच्या अंगातील क्षमता दिसून येते़ सारे धावपटू काही मिटरवर मागे असताना हा फिनिशिंग लाइनला पोहोचलेला असतो आणि बाजूला हसून बघत असतो. ही त्याची आवडती मुद्रा असते. असंख्य चाहत्यांनी ती असंख्य वेळा पाहीलीही आहे.
बोल्ट घरातला लाडका होता. घरचे म्हणतील तसं ऐकायचा. त्यामुळं त्याला फारशा वाईट सवयी लागल्या नाहीत, असं म्हणतात. पण त्याच्यावर कायमच डोपिंगचा आरोप होत आला आहे. जेव्हा जेव्हा त्यानं विक्रम प्रस्थापित केला तेव्हा तेव्हा त्यानं उत्तेजकं घेतल्याचे आरोप झाले. पण त्यानं तो अजिबात डगमगला नाही किंवा धावायची गतीही कधी कमी झाली नाही. कारण ‘‘ज्या गावीच जायचे नाही त्याबाबत विचार तरी कशाला करायचा,’’ असं तो म्हणतो़ त्याचे प्रशिक्षक ग्लेन मिल्सही अशा उत्तेजकांच्या विरोधात होते़ त्यांनी डोपिंग चाचणी करणा-यांनाही आव्हान दिलं होतं. बोल्टच्या सगळ्या टेस्ट तुम्ही घेऊ शकता, तो उत्तेजकं घेत नसल्याचंच सिद्ध होईल, असं ग्लेन यांनी एकदा म्हटलंही होतं.
गेल्या ऑलिम्पिकच्या आधी बोल्टच्या चार चाचण्या झाल्या आणि ज्या पदार्थांवर बॅन आहे असे कोणतेही उत्तेजक पदार्थ त्याच्या शरीरात आढळले नाहीत़ आम्ही मेहनत करतो़ ती पण जीवापाड अशा गोष्टींवर अवलंबून राहात नाही़ तुम्ही कोणत्याही क्षणी आमची चाचणी घ्या, असं बोल्टने स्पष्ट केलं होतं. डोपिंगच्या चुकीच्या बातम्यांमुळे बोल्टला आपला प्रायोजकही गमवावा लागला. पण त्याला फारसा फरक पडला नाही. कारण बाकी प्रायोजक रांगेत उभे होतेच. धावण्याच्या शर्यतीत बोल्टला पाहता येणार नाही. सध्या सुरू असलेली वर्ल्ड चॅम्पियनशीप ही बोल्टची अखेरची स्पर्धा आहे. सुवर्णपदकांची माळ गळ्यात घालून जगाला आपल्या एका बोटाने विक्रमांची नवी उंची दाखवणारा वेगाचा बादशाह एंड लाइनवर येऊन थांबला आहे. कधीही न धावण्यासाठी. सलाम बोल्ट!!