नवी दिल्ली : विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाच्या निवडीबाबत सुरू असलेल्या वादाला रविवारी नाट्यमय वळण मिळाले. तीन हजार मीटर स्टीपलचेस अॅथलिट सुधा सिंगच्या नावाचा आयएएएफच्या (आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघ) प्रवेश यादीमध्ये उल्लेख आहे, पण एएफआयने (भारतीय अॅथलेटिक्स महासंघ) मात्र विश्व स्पर्धेतील तिच्या समावेशाबाबत नकार दिला आहे.लंडन आॅलिम्पिक (२०१२) आणि रिओ आॅलिम्पिक (२०१६) या व्यतिरिक्त विश्व चॅम्पियनशिपमध्ये (२०१५) देशाचे प्रतिनिधित्व करणारी सुधा म्हणाली, ‘माझा व्हिसा तयार आहे. एएफआयने विश्व चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यास हिरवा कंदील दिल्यानंतर लगेच लंडनला जाण्याची तयारी राहील. मला यात स्थान मिळण्याची आशा होती. त्यामुळे मी न्यायालयाचे दार ठोठावले नाही. यापूर्वी पी. यू. चित्राने तो मार्ग अवलंबला आहे.एएफआयचा विचार मात्र वेगळाच आहे. स्पर्धेत सहभागी होणाºया जास्तीत जास्त खेळाडूंसह लंडनमध्ये डेरेदाखल झालेले भारताचे सहायक राष्ट्रीय प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी सांगितले की, सुधा स्पर्धेत सहभागी होणार नाही. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकावणारे खेळाडू विश्व स्पर्धेसाठी पात्र ठरतात, पण आयएएएफच्या नियमानुसार राष्ट्रीय महासंघाकडे उपखंडातील चॅम्पियनशिपच्या विजेत्यांना न पाठविण्याचा अधिकार आहे.सुधा, चित्रा व अजय कुमार सरोज (आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या १५०० मीटर दौड स्पर्धेतील विजेता) यांनी आयएएएफच्या पात्रता निकषानुसार किंवा ज्युनिअर गटातील विक्रमापेक्षाही सुमार कामगिरी केल्यामुळे त्यांना संघात स्थान मिळाले नाही. (वृत्तसंस्था)काय आहे प्रकरण ? -भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने अलीकडेच भुवनेश्वरमध्ये आयोजित आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकाविल्यानंतरही विश्व चॅम्पियनशिपसाठी जाहीर २४ खेळाडूंच्या संघात स्थान न मिळालेल्या तीन खेळाडूंमध्ये सुधाचा समावेश आहे. पण, आश्चर्याची बाब म्हणजे, सुधाचे नाव आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाने शनिवारी रात्री जाहीर केलेल्या भारतीय खेळाडूंच्या यादीमध्ये होते. सध्या धरमशाला येथे सराव करीत असलेली सुधा म्हणाली, ‘माझे नाव विश्व चॅम्पियनशिपच्या यादीमध्ये असल्याचे मला आताच कळले आहे. एएफआयतर्फे अद्याप कुणीच मला माझे नाव असल्याचे सांगितलेले नाही, पण मी लंडनमध्ये स्पर्धेत सहभागी होण्यास सज्ज आहे.’अधिकाºयांची चूक-२३ जुलै रोजी २४ सदस्यांचा संघ जाहीर झाल्यानंतर एएफआयने सुधाच्या नावाचा समावेश केला की महासंघाच्या अधिकाºयांच्या चुकीमुळे तिचे नाव चुकीने आयएएएफच्या प्रवेश यादीमध्ये झळकले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, एएफआयच्या सूत्रांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, अधिकाºयाच्या चुकीमुळे कदाचित हे घडले असावे. आॅनलाइन पद्धतीने तयार करण्यात आलेल्या अंतिम प्रवेश यादीतून त्यांना सुधाचे नाव वगळता आले नाही.’सूत्राने पुढे सांगितले की, ‘आॅनलाइन प्रवेश यादी असून प्रत्येक महासंघाला खेळाडूंच्या नावाचा समावेश करण्यास आयएएएफकडून पासवर्ड मिळाला आहे. प्रत्येक महासंघाने प्राथमिक यादी तयार केली होती. ही यादी मोठी होती. त्यात पात्रता निकष पूर्ण करण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंचाही समावेश होता.त्यानंतर महासंघाने अंतिम यादी तयार केली. त्यात संघात समावेश नसलेल्या खेळाडूंची नावे गाळण्यात आली. त्यामुळे एएफआयने अंतिम यादी तयार करताना कदाचित सुधाचे नाव गाळले नसावे, असे घडण्याची शक्यता आहे.’
चित्राने ठोठावले न्यायालयाचे दार-यापूर्वी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या १५०० मीटर दौड स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाºया पी. यू. चित्राने आशियाई स्पर्धेत अव्वल स्थान पटकावल्यानंतरही संघात स्थान न मिळाल्यामुळे केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.उच्च न्यायालयाने शुक्रवारी एएफआयला चित्राचा संघात समावेश करण्याचा आदेश दिला. क्रीडा मंत्रालयानेही चित्राला संघात स्थान देण्यास सांगितले.राष्ट्रीय महासंघाने आयएएएफकडे केलेली विनंती त्यांच्याकडून फेटाळण्यात आली आहे.