औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत "संभाजीनगर महाविकास आघाडीचा" फार्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 04:05 PM2020-02-13T16:05:51+5:302020-02-13T16:20:05+5:30
औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक आम्ही "संभाजीनगर महाविकास आघाडीचा"च्या नावाने लढवणार असल्याची माहिती दानवे यांनी माध्यमांना दिली आहे.
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसनेने एकत्र येत महाविकास आघाडीच्या सरकारची सत्ता स्थापन केली. त्यांनतर झालेल्या राज्यातील अनेक स्थानिक निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीचा 'फार्म्युला' पाहायला मिळाला होता. तर आता आगामी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुक सुद्धा, हे तिन्ही पक्ष सोबत लढवणार असल्याची माहिती शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे.
दानवे म्हणाले की, विधानसभेप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार आहे. याबाबतीत तिन्ही पक्षातील नेत्यांची बैठक पार पडली असून, यावर आमचे एकमत झाले असल्याचे सुद्धा ते म्हणाले.
या बैठकीत जागांवर चर्चा झाली नसून फक्त एकत्र लढण्याबाबत एकमत झाले आहे. ही आमची पहिलीच बैठक होती आणि ती सकारात्मक झाली असल्याचे दानवे म्हणाले. तर एक चांगली सुरवात आम्ही केली असल्याचे सुद्धा ते म्हणाले.
तसेच औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक आम्ही "संभाजीनगर महाविकास आघाडीचा"च्या नावाने लढवणार असल्याची माहिती दानवे यांनी माध्यमांना दिली आहे. आतापर्यंत निवडणुकीत एकेमकांना विरोध करणारे सर्वच नेते आम्ही या निमत्ताने एकत्र आलो आहोत. तर औरंगाबाद महानगरपालिकेत सुद्धा महाविकास आघाडीची सत्ता आणायची असल्याचे आमचे ठरले असून, आमची सत्ता येणारच असेही ते म्हणाले.