जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत ‘हाय व्होल्टेज ड्रामा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 11:52 AM2020-01-04T11:52:39+5:302020-01-04T12:16:48+5:30
विद्यमान अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थक सदस्यांना सोबत घेत ऐनवेळी बंडखोरी केली.
औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडणुकीत जि.प.च्या आवारात शुक्रवारी हाय व्होल्टेज ड्रामा घडला. शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थक सदस्यांना सोबत घेत ऐनवेळी बंडखोरी केली. त्यामुळे भाजप, काँग्रेस, शिवसेनेच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केल्याने वातावरण तापले. शीघ्र कृती दल, दंगा काबू पथकासह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना एक फोन आला अन् सगळे चित्रच पालटले.
जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपची शरणागती; शिवसेनेची नाचक्की
जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी मागील तीन वर्षांपासून सत्तेत आहे. यावेळीही महाविकास आघाडीची सत्ता येण्याचे घाटत होते. मात्र, ऐनवेळी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार समर्थक ६ सदस्य आणि शिवसेनेच्या विद्यमान अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर यांनी भाजपशी संधान साधत बंडखोरी केली. यावेळेस अध्यक्षपदाची संधी काँग्रेसला मिळाली असताना डोणगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. या पार्श्वभूमीवर मागील ८ दिवसांपासून सहलीवर पाठविलेले सदस्य दुपारी पावणेदोन वाजता जि.प.मध्ये हजर झाले. पहिल्यांदा महाविकास आघाडीचे सदस्य एकत्र आले. त्यानंतर भाजपचे सदस्य अवतरले. दोन्ही गटांचे सदस्य आल्यानंतर राज्यमंत्री सत्तार समर्थक आणि अॅड. डोणगावकर या सर्वात शेवटी आल्या.
औरंगाबाद जि. प. अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया थांबवली
दुपारी २ वाजता विशेष सभेला सुरुवात झाली. तोपर्यंत महाविकास आघाडीसह भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी समर्थकांसह दाखल झाले होते. सभागृहात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी बंडखोर अॅड. डोणगावकर, काँग्रेसच्या मीना शेळके आणि भाजपच्या अनुराधा चव्हाण यांचा अर्ज वैध ठरला. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २.३० ते २.४० ही वेळ देण्यात आली होती. मात्र, तीनपैकी एकाही सदस्याने अर्ज मागे घेतला नाही. ही माहिती बाहेर येताच महाविकास आघाडीचे समर्थक अस्वस्थ झाले. काँग्रेस उमेदवाराचे पती रामूकाका शेळके समर्थकांसह येताना पाहून एकच गोंधळ उडाला. उपस्थित घोळका त्यांच्याकडे धावत सुटला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
सभागृहातून अनेक अफवा सतत बाहेर येत होत्या. सुरुवातीला अॅड. डोणगावकर २८ विरुद्ध २७ मतांनी विजयी झाल्याची अफवा आली. त्यानंतर काही वेळातच प्रत्येकी २८ मते पडल्याचे सांगण्यात येऊ लागले. त्याचवेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, डॉ. भागवत कराड, एकनाथ जाधव हे भाजपच्या समर्थकांसह दाखल झाले. त्यांनी सभागृहात दोन लोकप्रतिनिधींना जाऊ देण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी ही मागणी धुडकावली. बाहेर अशी घालमेल सुरू असताना आतमध्ये काय होते. याविषयीची उत्कंठा क्षणाक्षणाला वाढत होती. शेवटी २९-२९ अशी समसमान मते पडली असून त्यानंतर काढलेल्या चिठ्ठीमध्ये मीना शेळके जिंकल्याची माहिती बाहेर आली. तीसुद्धा आफवाच असल्याचे स्पष्ट झाले.
भाजप सदस्याची धावपळ
भाजपच्या गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा सर्कलच्या सदस्या छाया जीवन अगरवाल या मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासांनी जि.प.च्या आवारात दाखल झाल्या. तोपर्यंत त्या सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यांना सभागृहापर्यंत अक्षरश: धावत आणण्यात आले. तरीही त्यांना आत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी सभागृहाच्या गॅलरीत येत मला आत जाऊ देत नाहीत, असे खाली उभ्या नेत्यांना ओरडून सांगितले. तेव्हा खाली मोठा गोंधळ उडाला.
बंडखोरांचे पती व जिल्हाप्रमुख भिडले
शिवसेनेच्या बंडखोर अॅड. देवयानी डोणगावकर यांचे पती उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती मिळताच जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी त्यांच्या हातातील अर्ज हिसकावून घेत फाडून टाकला. तेव्हा दोघांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. आ. दानवे यांनी त्यांना पक्षाचा आदेश सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास कृष्णा पाटील यांनी दाद दिली नाही. अर्ज फाडल्यानंतर दुसरा अर्ज घेत त्यांनी उमेदवारी दाखल केलीच.
बंडखोर उमेदवाराची गाडी अडवली
शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार अॅड. देवयानी डोणगावकर या भाजप सदस्या पुष्पा काळे, छाया अगरवाल यांच्यासोबत निवडणूक प्रक्रिया तहकूब झाल्यानंतर सभागृहातून बाहेर आल्या. त्यांना सुरक्षित गाडीपर्यंत पोहोचविण्यात आले. मात्र, गाडी थोडी पुढे जाताच आ. अंबादास दानवे यांनी ती अडवली. शिवसेनेचे गैरहजर सदस्य शीतल बनसोड आणि मनीषा सिदलंबे यांना घेऊन जात असल्याचा आक्षेप नोंदवत गाडीच्या काचा खाली करण्याची मागणी केली. तेव्हा पुन्हा गोंधळ उडाला. यात पोलिसांनी हस्तेक्षप करीत आ. दानवे यांना गाडीसमोरून हटवले.
बंडखोराला नव्हे, काँग्रेसला मतदान करा
बंडखोर अॅड. देवयानी डोणगावकर यांना मोनाली राजेंद्र राठोड या मतदान करणार होत्या. मात्र, हात उंचावून मतदान करण्याच्या वेळीच वडील राजेंद्र राठोड यांचा फोन गेला. त्यांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्याचा आदेश दिला. त्यांनी अर्धाच हात उंचावला. त्यामुळे काँग्रेसच्या मीना शेळके यांचे संख्याबळ २९ वर पोहोचले. मात्र, प्रत्यक्ष सही मात्र त्यांनी केली नाही. हा फोन आला नसता, तर गोंधळ उडाला नसता आणि सभा तहकूबही करावी लागली नसती, अशीही चर्चा सुरू आहे. पीठासीन अधिकारी भास्कर पालवे यांनी शनिवारच्या सभेत मोबाईल घेऊन येण्यास बंदी घालणार असल्याचे सांगितले.