कारमध्ये बदल करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, बरेचजण हौसेखातर कार, बाईकमध्ये मोठमोठे बदल करतात. कधी ते बाह्य स्वरुपाचे तर कधी ते अंतर्गत असतात. यासाठी मोठा खर्चही करतात. काहीवेळा हा खर्च कारच्या मूळ किंमतीएवढाही असतो. असाच एक प्रकार हरियाणामध्ये पहायला मिळाला आहे.
कारला अॅक्सेसरी कोणती लावावी यालाही काही मर्यादा असतात. हरियाणाच्या एका हौशी कार प्रेमीने त्याच्या जीपला चक्क ट्रेनचा हॉर्न बसविला आहे. या हॉर्नची किंमतही तशीच आहे. एक लाख रुपये. या कार प्रेमीने आपली हौसमौज भागविण्यासाठी या जीपवर आतापर्यंत तब्बल 7 लाखांचा खर्च केला आहे. ज्या खर्चात दुसरी नवीन जीप आली असती.
युट्यूबवर या व्यक्तीचा व्हिडिओ एका युजरने टाकला आहे. या हॉर्नचा आवाज तुम्हाला एक मैलावरूनही ऐकायला येईल. हा हॉर्न अजय बैसला नावाच्या या व्यक्तीने कॅनडावरून मागविला आहे. महत्वाचे म्हणजे या हॉर्नसाठी थार जीपच्या पाठीमागे प्रेशर सिलिंडर बसविण्यात आला आहे. खरे म्हणजे या हॉर्नची किंमत 1 लाख नाहीय, पण त्याच्या वाजण्यासाठी लागणाऱ्या सिस्टिमची किंमत आणि आयात शुल्क मिळून ती लाखावर पोहोचते.
हॉर्नची किंमत 25 हजार, कॉम्प्रेसरची किंमत 48 हजार आणि वाहतूक खर्च 20 हजार रुपये आला आहे.
या थारचा वापर केवळ ऑफरोडींगसाठी करता येणार आहे. कारण असे बदल भारतीय कायद्यानुसार अधिकृत नाहीत. यामुळे ऑफरोड रॅलीदरम्यानच अशा मॉडिफाईड कार वापरता येतात, असे अजय याने सांगितले.