बाइकवेड्या तरुणाईला 'याड' लावणाऱ्या मिडलवेट नेकेड स्ट्रीट-फायटर बाईक MT-09 चं नवं व्हर्जन यामाहाने भारतात लाँच केलं आहे. या नव्या व्हर्जनची इंजिन क्षमता आधीच्या व्हर्जनइतकीच आहे. परंतु, ग्राफिक्स आणि रंगसंगतीमुळे या बाइकची शान वाढलीय. स्वाभाविकच, तिची किंमतही आधीच्या बाइकपेक्षा १६ हजार रुपयांनी जास्त, म्हणजेच १०.५५ लाख रुपये आहे.
2019 यामाहा MT-09 या नव्याकोऱ्या बाइकचा 'नाइट फ्लुओ' कलर बघताक्षणी प्रेमात पडायला लावणारा आहे. रेड व्हील्ससोबत पांढऱ्या आणि काळ्या रंगाचं कॉम्बिनेशनही डोळ्यात भरतं आणि बाइकला स्पोर्टी लूक देतं. बाइकच्या हेड लॅम्पजवळ आणि टँकवर पांढऱ्या रंगाचं फिनिशिंग आहे. नाइट फ्लुओशिवाय ही बाइक निळ्या आणि टेक ब्लॅक रंगांतही मिळणार आहे. या बाइकचं वजन १९३ किलो आहे.
2019 यामाहा एमटी-09 मधे 847 सीसी, 3 सिलिंडर लिक्विड कूल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 10 हजार आरपीएमवर 113 बीएचपी ताकद आणि 87.5 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रदान करते. इंजिनला 6 गिअर देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी एबीएससह क्विक शिफ्ट सिस्टीम, ट्रॅकशन कॅट्रोल, स्लीपर क्लच सारखे अद्ययावत फिचर देण्यात आले आहेत.
वेगात असताना ब्रेक लागण्यासाठी पुढील चाकाला 298 मिमीच्या दोन डिस्क तर मागील चाकाला 245 मिमीची सिंगल डिस्क देण्यात आली आहे.
यामाहाची MT-09 ही बाइक Triumph Street Triple, Ducati Monster 821, Suzuki GSX-S750 आणि Kawasaki Z900 या कट्टर बाइक्सना टक्कर देईल, असं मानलं जातंय. पुढच्या महिन्यात MT-09 चं थोडं हलकं व्हर्जन MT-15 लाँच होणार असून त्याची किंमत १ लाख २० हजार रुपये असेल.