सध्या भारतीय बाजारात दुचाकींमध्ये चारच ईलेक्ट्रीक कंपन्यांची चलती आहे. ओला, बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब आणि एथर या चार कंपन्या बाजारात चांगल्या पाय रोवून आहेत. परंतू, या कंपन्यांच्या ग्राहकांना विविध समस्यांना समोरे जावे लागतच आहे. चेतकच्या स्कूटरमध्येही अनेकांना समस्या येत आहेत. एथरच्या ग्राहकांनाही येत आहेत. परंतू त्या ओलाएवढ्या जगजाहीर होत नाहीत. यामुळे अनेकांना या कंपन्यांच्या स्कूटर खूप चांगल्या आहेत असे वाटत आहे. ओलाची सर्व्हिस त्यातलेत्यात वाईटच आहे. परंतू, एथरचाही ग्राहक सर्व्हिसला वैतागलेला आहे. इलेक्ट्रीक गाड्यांच्याबाबत सर्व्हिसच महत्वाचा मुद्दा ठरलेला आहे. सोशल मीडियावर एथरच्या एका ग्राहकाची पोस्ट व्हायरल होत आहे.
चेन्नईच्या अंबत्तूरच्या पार्थसारथी नावाच्या ग्राहकाने एथरच्या शोरुमबाहेरच आपल्या स्कूटरला आग लावली आहे. स्कूटर सारखी सारखी बंद पडत असल्याने, मेंटेनन्स खूप देत असल्याने त्रस्त झाल्याने पार्थसारथीने कंटाळून हे पाऊल उचलले आहे.
अनुत्तरित तक्रारी आणि खराब सेवा यामुळे त्रासल्याचे या तरुणाने मीडियाला सांगितले आहे. शोरुमच्या कर्मचाऱ्यांनी त्याला हे करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न केला होता. १.८ लाख रुपये मोजून ही स्कूटर विकत घेतली, पहिल्याच महिन्यापासून या स्कूटरमध्ये समस्या येऊ लागल्या होत्या. दर ५ हजार किमीला मला बेअरिंग बदलायला सांगितले गेले. वारंवार दुरुस्तीसाठी ही स्कूटर सर्व्हिस सेंटरला न्यावी लागत होती. सुटे पार्ट नसल्याने सर्व्हिसला विलंब होत होता. नुकतेच मला स्कूटरचे ब्रेक पॅड, व्हील बेअरिंग आणि ड्राईव्ह बेल्ट बदलण्यास सांगण्यात आले, असा आरोप पार्थसारथीने केला आहे.
सर्व्हिसिंग आणि स्पेअर पार्टवर माझे दर महिन्याला ५००० रुपये खर्च होत आहेत. हा खर्च आता मूळ स्कूटरच्या किंमतीपेक्षा जास्त झाला आहे. तीन वर्षे मी हे झेलत असल्याचा आरोप या ग्राहकाने केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार एथरच्या सूत्रांनी पार्थसारथीच्या दाव्यांचे खंडण केले आहे. तीन वर्षांत ग्राहकाला सर्व्हिससाठी १०००० रुपयेच खर्च आला आहे.