Airbags in Car: भारतात दरवर्षी अपघातात हजारो लोकांचा जीव जातो. या दुर्घटना टाळण्यासाठी वाहनांमध्ये एअरबॅगची संख्या वाढविण्याबाबत दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी अशीही बातमी समोर आली होती की, केंद्र सरकार, सर्व कारमध्ये 6-एअरबॅग अनिवार्य करणार आहे. पण, आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कारसाठी 6 एअरबॅग अनिवार्य नसल्याचे म्हटले आहे.
ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ACMA) च्या वार्षिक बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सरकार कारसाठी 6 एअरबॅग नियम अनिवार्य करणार नाही. देशात अनेक वाहन उत्पादक कंपन्या आहेत, ज्या आधीपासून 6 एअरबॅग देत आहेत आणि त्या कंपन्या त्यांच्या कारची जाहिरातही करतात. अशा परिस्थितीत 6 एअरबॅग अनिवार्य करण्याची गरज नाही.
गडकरी पुढे म्हणाले की, देशातील वाहन क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. भारताने अलीकडेच जपानला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ बनली आहे. अशा परिस्थितीत वाहनांमध्येही नवीन तंत्रज्ञानाबाबत स्पर्धा वाढत आहे. वाहन मालकही नवीन तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांना प्राधान्य देत आहेत, त्यामुळे काही कंपन्यांनी त्यांच्या वाहनांमध्ये यापूर्वीच 6 एअरबॅग समाविष्ट केल्या आहेत. या परिस्थितीत, ज्या ब्रँड्सला स्पर्धेत राहायचे आहे, ते त्यांच्या वाहनांमध्ये 6 एअरबॅग्ज देतील. आम्ही ते अनिवार्य करणार नाही.
गडकरींच्या वक्तव्याने चर्चागेल्या वर्षी नितीन गडकरी म्हणाले होते की, वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा नियम ऑक्टोबर 2023 पासून लागू केला जाईल. त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, देशातील बहुतांश लहान कार मध्यमवर्गीय कुटुंबे खरेदी करतात आणि कमी बजेटच्या कारची मागणी सर्वाधिक असते. परंतु वाहन उत्पादक कंपन्या केवळ उच्च किमतीच्या प्रीमियम कारमध्येच 6 किंवा 8 एअरबॅग्जची सुविधा देतात. यावर त्यांनी चिंता व्यक्त केली होती.