काही दिवसांपूर्वीच मारुतीच्या आफ्रिकन बाजारासाठीच्या सात सीटर अर्टिगाला १ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली होती. ग्लोबल एनकॅपमध्ये भारतात बनलेल्या आणखी एका सात सीटर कारने आधीच्या ४ स्टारच्या तुलनेत यंदा २ स्टार मिळविले आहेत. रेनो ट्रायबर असे या एमपीव्हीचे नाव असून परवडणाऱ्या किंमतीत ही कार चांगली सुरक्षा पुरवत होती. परंतू, आताच्या क्रॅश टेस्टने ग्राहकांना धक्का दिला आहे.
रेनो ट्रायबरला २०२१ मध्ये क्रॅश टेस्टमध्ये ४ स्टार मिळाले होते. टाटा, महिंद्राच्या तुलनेत ही एक चांगली कामगिरी होती. परंतू, आता या कारने दोन स्टार आणले आहेत. पुढून आणि बाजुने प्रहार झाल्यास ड्रायव्हर आणि पॅसेंजरच्या छातीला या कारमध्ये सुरक्षा मिळालेली नाही. यामुळे वयस्कांच्या सुरक्षेत ट्रायबरने ३४ पैकी २२.२९ पॉईंट मिळविले आहेत.
तसेच आयसोफिक्स नसल्याचा देखील ट्रायबरला फटका बसला आहे. ४९ पैकी १९.९९ पॉईंट मिळाले आहेत. या चाईल्ड सेफ्टी टेस्टमध्ये डमी मुलाच्या डोक्याला, मानेला आणि छातीला मार बसला आहे. ट्रायबरमध्ये दोनच एअरबॅग मिळतात. साईड एअरबॅग नसल्याने साईड इम्पॅक्ट पोलची टेस्ट करण्यात आली नाही.
अर्टिगाप्रमाणे ट्रायबरचे बॉडी स्ट्रक्चरदेखील अस्थिर असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. जागतिक ब्रँड असलेल्या रेनो कंपनीकडून असे प्रदर्शन झाल्याने आम्ही निराश असल्याचे जी एनकॅपचे जनरल सेक्रेटरी अलेजांड्रो फुरास यांनी म्हटले आहे. अन्य बाजारात उच्च सुरक्षा असलेली वाहने देणाऱ्या कंपनीकडून ही अपेक्षा नव्हती. आफ्रिकन ग्राहक हीच सुरक्षा मिळण्यास पात्रतेचे नाहीत का असा सवाल केला आहे.