देशात 1 एप्रिल 2023 पासून वाहतुकीशी संबंधित अनेक नवे नियम लागू झाले आहेत. या नियमांसंदर्भात आपल्याला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. यात आता आपल्या वाहनाच्या टायरशी संबंधित नव्या नियमाचाही समावेश आहे. काही माध्यमांतील वृत्तांनुसार, एक्सप्रेस वे एजन्सी आणि आरटीओ आता एक्स्प्रेस वेवर चालणाऱ्या वाहनांची तपासणी करत आहेत. या तपासणीत आपल्या वाहनाच्या टायरमध्ये दोष आढळल्यास, आपल्या वाहनाला 20 हजार रुपयांपर्यंतचा दंडही होऊ शकतो. मात्र, अद्याप दंडाची रक्कम निश्चित झालेली नाही. खरे तर, एक्सप्रेस-वेवर गाडी वेगात असताना टायरही फुटू शकतो. यामुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. हे लक्षात घेत टायरशी संबंधित नियम करण्यात आले आहेत.
देशांतर्गत एक्सप्रेस-वे आणि हायवेंवर वाहनांच्या वेगासंदर्भात विविध स्वरुपाचे नियम तयार करण्यात आलेले आहेत. यात एक्सप्रेस-वेवर धावणाऱ्या वाहनांची स्पीड 120 किलोमीटर प्रती तास एवढी आहे. त्यामुळे एवढ्या वेगाने धावणाऱ्य वाहनाचे टायर चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे, मुंबई-नागपूर एक्सप्रेस-वेवर ओव्हर स्पीडमुळे अनेक अपघात झाले आहेत.
भारतात नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस-वेवरून धावणाऱ्या वाहनांच्या वेगासंदर्भात वेगवेगळे नियम आहेत. नॅशनल हायवेवर कारसाठी जास्तीत जास्त 100km/h एवढी स्पीड लिमिट निश्चित करण्यात आली आहे. तर एक्सप्रेस-वेवर ही मर्यादा 120km/h एवढी आहे. याशिवाय टू-व्हीलर आणि जड वाहनांसाठीही वेग मर्यादा वेगवेगळी आहे. टू-व्हीलरसाठी हायवे आणि एक्सप्रेसवेवरील वेग मर्यादा 80km/h, तर हेवी व्हेइकल, जसे बस आणि ट्रक साठी वेगमर्यादा 100km/h पर्यंत आहे. तसेच हिवाळ्याच्या दिवसांत वेग मर्यादा कमी केली जाते.
CCTV कॅमऱ्यांची राहणार नजर -देशातील जवळपास सर्वच एक्सप्रेस-वेवर असे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. ते वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवतात. जर आपल्या वाहनाचा वेग 120km/h पेक्षा अधिक असेल तर पुढील टोल प्लाझावर त्याची वेळ समजते. यानंतर तेथे दंड आकारला जाऊ शकतो. हा दंड निश्चित असला तरी वेगानुसार अधिकही होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे, दंड न भरल्यास ड्रायव्हिंग लायसन्स कॅन्सलही होऊ शकते.