इलेक्ट्रिक दुचाकींची बाजारपेठ सातत्याने वाढताना दिसत आहे. बाजारात सातत्याने नवनवीन कंपन्या येत आहेत. मात्र, बऱ्याच दिवसांपासून हिरो इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीच्या बाबतीत क्रमांक एकवर होती. पण सप्टेंबर महिन्यात मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे. ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) आता सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर्स विकणारी कंपनी बनली आहे. Vahan पोर्टलनुसार, Ola Electricने सप्टेंबर 2022 महिन्यात 9,634 युनिट्सची विक्री केली आहे. ही विक्री सर्वाधिक आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत ओलाने 180 टक्क्यांची ग्रोथ नोंदवली आहे.
ओलाने ऑगस्ट 2022 मध्ये 3,440 युनिट्सची विक्री केली होती. वाहन रजिस्ट्रेशन डेटानुसार, इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सच्या विक्रीत Okinawa Autotech दुसऱ्या क्रमांकावर आहे. Okinawa Autotech ने 8,278 युनिट्सची विक्री केली आहे. याच प्रमाणे हिरो इलेक्ट्रिकने 8,018 युनिट्सची विक्री केली आहे. तर एथरने 6,164 युनिट्सची विक्री केली आहे. खरे तर, वाहन पोर्टलवर केवळ, जेवढी वाहने रजिस्टर आहेत, तेवढाच आकडा दिसतो. कारण कंपनी आपल्या आकडेवारीत डिलर्सना पाठविण्यात आलेल्या युनिट्सचीच माहिती देत असते.
या स्कूटरनं बदललं कंपनीचं नशीब -आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सचे संपूर्ण श्रेय ओला इलेक्ट्रिकने Ola S1 स्कूटरला दिले आहे. हे कंपनीच्या OLA S1 Pro चे स्वस्त व्हर्जन आहे. विक्रीच्या पहिल्या दिवशीच या स्कुटरच्या 10 हजार युनिट्सची विक्री झाली होती. कंपनीने मार्च 2023 पर्यंत 200 केंद्र सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.