कारमधील जागेचा पुरेपूर वापर केला जाणे हे कारच्या विशेष करून हॅचबॅकसारख्या छोट्या कारच्या बाबतीत तसे कौशल्याचे काम आहे. मात्र आजकाल कारच्या या जागेच्या पुरेपूर वापरापेक्षा कारच्या अंतर्गत सौंदर्याकडे जास्त लक्ष दिले जाते. वास्तविक ते सारे ग्राहकाला हवेच आहे, पण ती एक ग्राहकाच्या मनाची बाजू झाली. ग्राहकाला कारच्या अंतर्गत रचनेमध्ये मोकळेपणा जसा आवश्यक वाटतो तसाच त्याला कारच्या जागेमध्ये जास्तीतजास्त उपयुक्तता देणाऱ्या सुविधाही महत्त्वाच्या वाटतात. मात्र आज भारतीय कार उत्पादक तितका विचार करीत नाहीत. त्यापेक्षा ते कारच्या अंतर्गत रचनेमधील सौदर्याकडे ग्राहकांची नजर वळवतात. शोरूम्समधील एखाद्या कागदावर तुम्हाला निवडक प्रश्न विचारतात, अर्थात ते कार उत्पादकामधील काही लोकांनी तयार केलेले असतात व प्रामुख्याने ते मार्केटिंगच्या धर्तीवर विचारलेले असतात. त्यातून खरोखरच कारच्या ग्राहकाला नेमके काय हवे आहे, हे विचारण्याऐवजी त्याला छान काय वाटते, रंग, ड्युएलटोन, एअरबॅगसारख्या सुविधा, लाइटची रचना, सीटवरील कव्हर इत्यादी बाबींबद्दलच गुंतवून ठेवलेले हे प्रश्न असतात.मारुती सुझुकीची वॅगन आर १६ इनोव्हेशन्स दिले आहेत, असे सांगत बाजारात दाखल झाली होती. त्यात कॉस्टकटिंग हा विचार न करता त्यात ग्राहकांच्या उपयुक्ततावादी गोष्टींची दखल घेतली होती. त्यामध्ये प्रवासी क्षमता ड्रायव्हरसह ४ जणांची होती. मागे दोन ५०-५० च्या रचनेतील आसने व पुढे दोन स्वतंत्र आसने.,ही सर्व आसने जवळजवळ फ्लॅट होऊ शकत होती. त्यामुळे दोनजण आरामात झोपू शकत. एअरलाइन कम्फर्ट अशा रचनेतील ही आसन रचना होती. मात्र नंतर ती गायब झाली. हबॅचबॅकमध्ये अशा प्रकारची रचना नंतर कोणत्याही हॅचबॅक व ४ मीटरच्या आतील लांबीच्या हॅचबॅकमध्ये दिसली नाही. इतकेच काय सर्वच एसयूव्हीमध्येही ती आज दिसत नाही. उपयुक्तता वाद म्हणजे या पद्धतीने विकसित झाला असता तर खरोखरच भारतीय ग्राहकाचा विचार केला गेला असता,असे म्हणावे लागेल. आज प्लॅस्टिकच्या लहान मोठ्या कप्प्यांची रचना दरवाज्याच्या आतील भागात देऊन त्यात किती किती वस्तू ठेवता येतीलस, असे सांगत मार्केटिंग करण्याची वेळ कंपन्यांवर आली आहे. कॉस्ट कटिंग करताना प्लॅस्टिकचा पूर्वीचा दर्जाही नाही, ना पत्र्याचा गेज जाड ठेवलेला नाही, ना सिलेंडरची संख्या ४ ठेवण्याचा प्रयत्नही सर्वांनी केलेला नाही. कार ही जेव्हा कौटुंबिक वापरासाठी वा वैयक्तिक वापरासाठी वापरली जाते, तेव्हा त्यासाठी विविध बाबींचा विचार करावा लागतो. वास्तविक सध्याच्या बहुतांशी हॅचबॅकमध्ये रुंदी पाहिली, तर भारतीय माणसाच्या शरीराचा व कुंटुंबातील विविध व्यक्तींच्या शरीराचा सर्वसामान्य विचार केला तर हॅचबॅकच्या रुंदीमध्ये मागे दोन माणसे आरामात बसू शकतील. मात्र त्या ठिकाणी तीन माणसांची रचना दाखवली गेलेली आहे. त्यादृष्टीने तीन माणसांना बसण्यासाठी काही आवश्यक बदल केले गेल्याने त्या कमी रुंदीच्या दागेतही तीन माणसे कशी काय बसू शकतात हे त्यांचे त्यांना माहिती, असे म्हणण्याची वेळ आली आहे. अशा कारमध्ये लेगस्पेस नीट नसली तरी तीन माणसे बसतात कशीबशी, पण लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी भारतीय ग्राहकांनी त्या गोष्टीची सवय करून घेतली आहे. त्यामुळे त्यांना ते चालते, किंवा त्यांनी ते चालवून घेतले आहे. अशा मुळे झाले काय की ग्राहक नीट आपला दबाव उत्पादक कंपन्यांवर राखू शकत नाही. त्यामुळे उत्पादक कंपन्या कारच्या अंतर्गत भागाचा वापर करताना ग्राहकांच्या खऱ्या सुखसुविधांसाठी वापर करण्याऐवजी कॉस्टकटिंग करीत, एका गाडीत मागे तीन पुढे दोन अशी बसण्याची सुविधा असल्याचे सांगत मागे सिंग ल सलग सीट ठेवतो. मात्र अशामुळे ज्यांना पाठी आरामात बसतील अशा दोन माणसांच्या सुविधासह आसनव्यवस्था हवी असेल तर त्यांना आहे त्या सीटमध्ये सामावून घ्यावे लागते किंवा मग स्वतंत्रपणे बाहेरून सीट तयार करून घ्यावी लागते. खरे म्हणजे प्रत्येक कंपन्यांनी आपल्या कारच्या ठरावीक मॉडेल्सनंतर कस्टमाइज्ड सुविधा देण्यासाठी अंतर्गत रचनेचा विचार करावा, त्यामुळे ज्यांना आवश्यक सुविधा हव्या आहेत, त्या कंपनी स्वतः तयार करून देऊ शकेल, त्या सुविधांची जबाबदारीही कंपन्यांना घ्यावी लागेल व त्यामुळे ग्राहकांनाही खऱ्या अर्थाने जागेचे मूल्य दिल्याचे समाधान लागू शकेल. अन्यथा वरच्या श्रेणीमध्ये दिलेल्या अंतर्गत सुविधेतील उच्च बाबी या केवळ सौंदर्यसाधनेपुरत्याच राहिल्या आहेत, असे म्हणावे लागेल. कार ही अंतर्गत सौदर्यापेक्षा अंतर्गत जागेचा भरपूर वापर करून उपयुक्तही असली पाहिजे, हा विचार भारतीय ग्राहकाला करू न देण्याचा विडाच जणू सध्या कार उत्पादकांनी घेतला आहे का, असा प्रश्न पडतो. कारण कार ही ग्राहकाने स्वतःच्या आरामदायी प्रवासासाठी घेतलेले साधन आहे, असावे, हे बहुधा ग्राहक कंपन्यांच्या कॉस्टकटिंग धोरमामुळे विसरला असावा, अशी स्थिती आहे.
हॅचबॅचकच्या अंतर्गत जागेचा पुरेपूर वापर करण्याचे कौशल्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 6:00 PM