नवी दिल्ली : वाहन निर्मिती क्षेत्रासाठी लागणारे सुटे भाग सरसकट 18 टक्के जीएसटी रचनेमध्ये आणण्याची मागणी सुटे भाग उत्पादकांच्या संघटनेने केली आहे. ऑटो सेक्टर सर्वाधिक कर भरणारे क्षेत्र आहे. यामुळे जीएसटी 18 टक्क्यांवर आणल्यास त्याचा फायदा उत्पादनवाढीला होऊ शकतो, असा दावा संघटनेने केला आहे. वाहन क्षेत्राला सुटे भाग बनविणाऱ्या या क्षेत्राने 2017-18 मध्ये 18.3 टक्क्यांची वाढ नोंदविली होती. सध्या 18 टक्क्यांच्या करमर्यादेमध्ये 60 टक्केच सुटे भाग येतात, तर उर्वरित 40 टक्के भाग हे 28 टक्क्यांच्या कर मर्यादेत मोडतात. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठीचे सुटे भाग येतात. यामुळे जर सुटे भाग सरसकट 18 टक्क्यांच्या कररचनेमध्ये आणल्यास त्याचा फायदा उत्पादकांबरोबरच ग्राहकांनाही होईल, असे एसीएमए अध्यक्ष निर्मल मिंडा यांनी सांगितले.याचबरोबर संशोधन आणि विकासासाठी केंद्र सरकारने निधीही देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीसाठी एक स्पष्ट धोरण आखण्याची मागणीही त्यांनी केली. 2030 पर्यंत भारतात विजेवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती आणि विक्री सुरु होणार आहे. यासाठी वाहन क्षेत्राला एका अद्ययावत तंत्रज्ञानाची आणि धोरणाची गरज असल्याचेही मिंडा यांनी सांगितले.
वाहनांच्या सुट्या भागांसाठी सरसकट 18 टक्के जीएसटी हवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 9:32 AM
वाहनांचे सुटे भाग बनविणाऱ्या क्षेत्राने 2017-18 मध्ये 18.3 टक्क्यांची वाढ नोंदविली
ठळक मुद्देदुचाकी आणि ट्रॅक्टरसाठीचे सुटे भाग 28 टक्क्यांच्या कर रचनेत येतात.