मुंबई : वाहनांच्या खिडक्या व विन्डस्क्रिनच्या कांचावर काळ्या फिल्म किंवा काळी काच लावणाºयावर पुन्हा कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. राज्यभरात ही मोहीम पुन्हा सुरु करण्यात येणार असून संबंधित वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. राज्याचे वाहतुक विभागाचे प्रमुख अप्पर महासंचालक (राज्य महामार्ग) विनय कारगांवकर यांनी त्याबाबतचे आदेश सर्व घटकप्रमुखांना दिले आहेत.
अर्थात अति महत्वाच्या व महत्वाच्या व्यक्तीसाठी तसेच सुरक्षेच्या कारणास्तव झेड व झेड प्लस सुरक्षा असणाºया व्यक्तींच्या वाहनांना या कारवाईतून सुट देण्यात आलेली आहे.सर्वोच्च न्यायालयात २०११ मध्ये अविषेक गोयंका यांनी दाखल असलेल्या एका याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने सात वर्षापूर्वी संबंधित वाहनधारकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. काचावर काळ्या फिल्म किंवा अन्य कोणत्याही प्रकारची फिल्म असल्याने गाडीच्या आत एखादे दुष्कृत्य होत असल्यास ते लक्षात येत नाही. विशेषत: महिला, बालकांचे अपहरण, लैगिंक अत्याचार सारखी प्रकरणे अशामुळे घडण्याचा धोका व्यक्त केला होता. त्यामुळे ती कोर्टाने बेकायदेशीर ठरविल्याने पोलीस महासंचालकांनी २०१२ मध्ये त्याबाबतचे कारवाई करण्याची सूचना सर्व आयुक्तालय/ अधीक्षकांना केली होती. त्यानुसार अशा वाहनावर कारवाई करण्यात आली. मात्र कालांतराने त्यामध्ये शिथीलता येवून दुर्लक्ष करण्यात आले.
परिणामी आजही अनेक गाड्याच्या काचा काळ्या असल्याचे दिसून येते. त्यामुळे अपहरण, लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये वाढ होत असल्याने त्याविरुद्ध पुन्हा कडक मोहीम सुरु करण्याचे आदेश राज्य वाहतुक विभागाच्या अप्पर महासंचालकांनी दिलेले आहेत. याबाबत कारवाईकडे दुर्लक्ष करणाºयाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवमान होणार असून संबंधितांना त्याची जाणीव करुन देण्याची सूचना घटक प्रमुखांना करण्यात आली आहे.