स्कूटर ही आज अनेकांची नित्याची गरज बनली आहे. काहींना ती सखी वाटते कारण तुमचा व तिचा सहवासही खूप असतो. अगदी प्रिय सखी प्रमाणे स्कूटर सांभाळणारे अनेकजण आहेत. पण त्या स्कूटरीला विनाकारण सजवण्यात काहींना फार धन्यता वाटत असते. प्राणापलीकडेही जपणारे स्कूटरस्वार कमी नाहीत. पण हे करीत असताना अतिरेक मात्र करू नये. हँडलला झिरमिळ्या लावणे, वेगळ्या प्रकारचे आरसे बसवणे व शोबाजीसाठी मोठे हॉर्न लावणे, जास्ती प्रखर हेडलॅम्पचे बल्ब लावणे, इतकेच कशाला सीटसुद्धा काही स्कूटर्सना वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. आजकालच्या स्कूटर्स या प्रामुख्याने ऑटोगीयर व वजनाने हलक्या असून त्यांचे आरेखन सर्वसाधारणपणे एरोडायनॅमिक असून अशा त्या आरेखनाला धक्का देणाऱ्या अटॅचमेंट्स खरे म्हणजे करू नये. एरोडायनॅमिक आकारामुळे स्कूटरचा समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे हायवेवर चालवताना वजनाला हलकी असलेली स्कूटर समोरून वा बाजून वेगात जाणाऱ्या वाहनामुळे बसणारा हवेचा स्रोत कापून जाऊ शकते. मात्र आरेखनामध्ये असे काही फेरफार केले गेले तर त्यामुळे कदाचित स्कूटर व्हॉबल होते, हलते, त्यामुळे स्कूटरचा समतोल नष्ट होऊन ड्रायव्हिंगवर ताण पडतो. स्कूटरचे वजन हा देखील आरेखनामध्ये विचारात घेतलेला भाग असतो. त्यामुळे विशिष्ट प्रमाणआपेक्षा वजन वाढले गेले तर स्कूटर चालवणार्याला त्यामध्ये फरक झालेला जाणवतो. स्कूटरवर चालवणाऱ्या माणसाचे व मागे बसणाऱ्याचे वजन किती हे ठरावीक प्रमाणात ग्राह्य धरलेले असते. जर जास्त वजनाची व्यक्ती स्कूटरवर पिलीयन रायडर असेल तर किंवा एकंदर दोन माणसांपेक्षा जास्त माणसे स्कूटरवर लादली तर स्कूटर चालवताना येणारा ताण हा घातक असतो, तसाच हा प्रकार आहे. कंपनीने स्कूटर तयार करताना आरेखन करताना अनेक बाबी विचारात घेतलेल्या असतात. त्यामुळे त्या आरेखनात व दिलेल्या काही सूचनांनुसार स्कूटरमध्ये अनावश्यक बदल करू नयेत.आजच्या काळात मोटारसायकल वा स्कूटर त्यात देणअयात आलेली साधने, अतिरिक्त साधने पाहिली जातात त्यानंतर त्यात भर टाकली जात असते. विनाकारण रंगावरही स्टिकर्स लावून त्यात काहीतरी वैविध्यता आणण्याचा प्रयत्न केला जातो. स्कूटरचा रंग हा देखील एक आरेखनातील भाग आहे. स्कूटर रात्रीच्यावेळी अन्य वाहन चालकांना नजरेस नीटपणे आली तर उपयोग, त्यामुळे अन्य वाहनचालकाला काही संभ्रम झाला, त्याला स्पष्टपणे स्कूटर्सचे कॉर्नर्स दिसले नाहीत, तर अपघातही होऊ शकतो. त्यामुळे स्कूटरला स्टिकर्स लावतानाही या सकर्व रचना ध्यानात घेतल्या पाहिजेत. अन्यथा तुमची सखी तुमची वैरिणही बनू शकते.
स्कूटरच्या अतिरिक्त सुविधांना आळा हवाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:12 PM