गेल्या तीन दशकांपासून देशाची सेवा बजावणारी जिप्सी कार यावर्षी बंद होणार आहे. मारुती सुझुकी या कारचे बुकिंग घेणे डिसेंबरपासून बंद करणार आहे. या कारचे उत्पादन 1985 मध्ये सुरु झाले होते. या जिप्सीला लष्कर, पोलिस दलाकडून मोठी पसंती मिळाली होती.जिप्सी ही कार भारतीय लष्कराला खूपच सोयीची ठरली होती. मजबुती आणि दमदार इंजिनामुळे सेनेने तिला आपल्या ताफ्यात ठेवले होते. आजही ही जिप्सी भारतीय लष्कराकडे सेवा बजावत आहे.
नुकतेच लष्कराने टाटाच्या सफारीला पसंती दिली आहे. यामुळे मारुतीने ही कार बंद करायची ठरविली असून या कारची जागा दुसरी कार घेणार आहे. 1985 नंतर मारुतीने या कारच्या इंजिनामध्ये मोठे बदल केले. मात्र, या कारचा लूक आणि डिझाईन बदलली नाही. पहिल्यांदा या कारमध्ये 1.0 लीटरचे इंजिन देण्यात आले होते. नंतर 1.3 लीटर चे G13BA कार्बोरेटर इंजिन देण्यात आले. सध्याच्या जिप्सीमध्ये BS4 वाले इंजिन आहे.
नवीन BS6 नियमावली आणि सुरक्षेचे नियमांमध्ये न बसल्याने मारुती ओम्नी ही कार बंद करण्यात आली होती. आता जिप्सीही बंद करण्यात येणार आहे. या कारची किंमत सध्या 7.5 लाख रुपये असून त्यामध्ये ना ही एसी आहे ना ही पावर स्टेअरिंग. यामुळे ही कार अद्ययावत होऊन नव्या रुपात येण्याची शक्यता आहे.