कारच्या रिपेअरिंगचे अव्वाचे सव्वा बिल काढण्यामुळे अमेरिकी कार कंपनी फोर्ड भारतात बदनाम झाली होती. यातून ती भारतातून दुसऱ्यांदा गेली तरी सावरू शकली नाहीय. असे असताना आता महागडी सर्व्हिसिंग समजल्या जाणाऱ्या जर्मन कार कंपनी फोक्सवॅगनने कडी केली आहे. कारची किंमतच ११ लाख असताना तिच्या रिपेअरिंगचे बिल तब्बल दुप्पट आकारले आहे.
बंगळुरुच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. कार रिपेअरिंगचे बिल २२ लाख आल्याचे पाहून त्यालाही धडकी भरल्याचे यात म्हटले आहे. बंगळुरूच्या अनिरुद्ध गणेश या व्यक्तीने लिंक्डइनवर ही पोस्ट केली आहे. अनिरुद्ध हा अॅमेझॉनमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. बंगळुरूमध्ये गेल्या महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता. या पावसाच्या पाण्यात त्य़ाची कार बुडाली होती. त्याच्याकडे Volkswagen Polo Hatchback कार आहे. त्याने ही कार दुरुस्त करण्यासाठी व्हाईटफिल्डच्या सर्व्हिस स्टेशनला दिली होती.
२० दिवसांनी त्याची कार दुरुस्त झाल्याचा त्याला कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमधून फोन आला. तो तिथे गेला असता त्याच्या हातात २२ लाखांचे बिल देण्यात आले. सुरुवातीला त्याला विश्वास बसेना, परंतू नंतर त्याने तो आकडा पाहिला आणि हादरलाच. अरे नव्या कारची किंमत ११ लाख नाही आणि २२ लाखांचे बिल कसे काय? असा प्रश्न त्याला पडला. आता ही कार बिल भरून घेऊन जावी, तशीच सर्व्हिस सेंटरमध्ये सोडावी, या प्रश्नात तो अडकला.
याबाबत त्याने Volkswagen मैनेजमेंटलाच ईमेल पाठविला. कंपनीलाही काहीतरी चुकलेय याची जाणीव झाली. लगेचच यावर हस्तक्षेप करत कंपनीने त्याचे २२ लाखांचे बिल ५ हजारांवर आणत सेटलमेंट करून टाकली. आता फोक्सवॅगनच्या प्रतापाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत या कंपनीच्या कारचा मेन्टेनन्स खूप जास्त असल्याची ग्राहकांची ओरड असते.