नवी दिल्ली : सेकंड हँड कार, बाईक व अन्य वाहनांच्या खरेदी-विक्रीतील फसवणूक रोखण्यासाठी सरकारने नियमांत बदल केले आहेत.रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने नवे नियम जारी केले आहेत. मोटार वाहन नियम १९८९ मध्ये ३ सुधारणा करण्यात आल्या आहेत.
नव्या नियमानुसार, केवळ आरटीओकडे नोंदणीकृत डिलर अथवा कंपन्याच जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करू शकतील. मध्यस्थांना फेरविक्रीसाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाची माहिती अधिकाऱ्यांना द्यावी लागेल. डिलर हे ताब्यातील वाहनांची नोंदणी, फिटनेस सर्टिफिकेट, एनओसी आणि हस्तांतरणासाठी थेट अर्ज करू शकतील. इलेक्ट्रॉनिक वाहनांची ट्रिप नोंदणी ठेवावी लागेल.
वाहतूकतज्ज्ञांनी सांगितले की, जुने वाहन विकताना डिलर वाहन मालकांची विक्री पत्रावर सही घेऊन ठेवत असे. विक्री होईपर्यंत गाडी त्याच्याच ताब्यात राहत असल्यामुळे ती कोण चालवते याची माहिती मालकास होत नसे. आता डिलरला गाडी पहिल्यांदा आपल्या नावावर करावी लागेल. त्यामुळे वाहन मालकाची जबाबदारी गाडी विकताच संपेल. त्यामुळे व्यवहार पूर्ण झाल्यानंतर मालकाला चिंता राहणार नाही.