नवी दिल्ली : तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये उडणारी वाहने पाहिली असतील, पण हा फक्त एक स्पेशल इफेक्ट असतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र, आता खरोखरच उडणारी कार पाहायला मिळणार आहे. Alef Model A, जी एक इलेक्ट्रिक फ्लाइंग कार असणार आहे. यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) कडून या कारला विशेष वायुयोग्यता प्रमाणपत्र (Special Airworthiness Certification) मिळाले आहे.
तंत्रज्ञान जसजसे विकसित होत आहे, तसतसे कार देखील अधिक प्रगत होत आहेत. याचा पुरावा दरवर्षी ऑटो एक्स्पोदरम्यान पाहायला मिळतो. यामध्ये अशा अनेक कॉन्सेप्ट कार दाखवल्या जातात की, त्या पुढील काही वर्षांत तुमच्यापर्यंत पोहोचतील. यामध्ये उच्च कार्यक्षमता असलेल्या ईव्ही, इंधन कार्यक्षम स्पोर्ट्स कार आणि आता फ्लाइंग कारचा समावेश आहे.
अमेरिकन कंपनी Alef एरोनॉटिक्सने आपल्या फ्लाइंग कारला कायदेशीर मान्यता मिळाल्याने एक विशेष कामगिरी केली आहे. कंपनीने नुकतेच जाहीर केले की, कारला यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने विशेष वायुयोग्यता प्रमाणपत्र दिले आहे. युनायटेड स्टेट्समध्ये फ्लाइंग कारला अशी मान्यता मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याने हे प्रमाणपत्र एक यश आहे.
दरम्यान, एव्हिएशन लॉ फर्म एयरो लॉ सेंटरने याला दुजोरा दिला आहे. रस्ता/हवाई चाचणीसाठी यूएस सरकारकडून कायदेशीर मान्यता मिळवणारी ही पहिली पूर्ण-इलेक्ट्रिक फ्लाइंग कार असल्याचा कंपनीचा दावा आहे. दरम्यान Alef ला 'मॉडेल A' विकासादरम्यान कोणत्याही दोष आढळला तर याचा रिपोर्ट अमेरिकेच्या सरकारला देणे आवश्यक आहे.
किती लोक करतील प्रवास?Alef फ्लाइंग कारमध्ये आठ प्रोपेलर बसवलेले आहेत. आतापर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक फ्लाइंग कारमध्ये एक किंवा दोन लोक बसण्याची क्षमता होती. मात्र, कंपनीने लवकरच अधिक क्षमतेची फ्लाइंग कार बनविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
फ्लाइंग कारची रेंजकंपनीचा दावा आहे की Alef मॉडेल ए फ्लाइंग कारमध्ये व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग क्षमता आहे. Alef फ्लाइंग कार रस्त्यावर 322 किमी (200 मैल) आणि 177 किमी (110 मैल) फ्लाइंग रेंज देईल.
प्री-बुकिंग सुरूकंपनीचे म्हणणे आहे की, ग्राहक आणि कंपन्यांकडून फ्लाइंग कारसाठी अनेक प्री-ऑर्डर रिक्वेस्ट मिळाल्या आहेत. तसेच, कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर, कंपनीने सामान्य लाइनसाठी 150 डॉलर आणि प्राथमिक लाइनसाठी 1,500 डॉलरच्या टोकन रकमेवर प्री-बुकिंग सुरू केले आहे.
किती असेल किंमत?Alef मॉडेल इलेक्ट्रिक फ्लाइंग कारची किंमत 2,99,999 डॉलर असण्याची शक्यता आहे, जी भारतीय चलनात सुमारे 2.46 कोटी रुपये असेल. दरम्यान, ऑक्टोबर 2022 मध्ये Alef एरोनॉटिक्सने 'मॉडेल ए' फ्लाइंग कारच्या प्रोटोटाइपचे अनावरण केले होते. आता कंपनीने स्पष्ट केले आहे की फ्लाइंग कार 2025 मध्ये लाँच होईल.