टायर ही कार वा कोणत्याही वाहनासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. टायरशिवाय कार चालवणे कसे असेल, याचा विचारही आज करू शकत नाही. याच टायरमुळे आपल्या वाहनाचा समतोल राखला जातो, ड्रायव्हिंगमध्ये सुलभपणा जाणवतो, सुरक्षितता येते अशा बऱ्याच बाबी या टायरशी निगडित असतात. जर टायर नीट नसेल तर काय होईल, याचा विचारही खरे म्हणजे करवणार नाही. टायरशिवया कार व्यर्थ आहे, असेच म्हणावे लागते.विविध प्रकारच्या रस्त्यावरून, पृष्ठभागावरून तुमची कार सुरक्षितपणे व तुम्हाला किमान त्रास होईल, अशा प्रकारे वहन करणारा टायर हा अतिशय मोलाचा आहे.
आज विविध पद्धतीचे टायर विकसित झाले आहेत. केवळ रबर नाही, तर अन्य काही घटकांनीही टायर तयार करून तुमच्यापुढे आणले गेलेले आहेत. चक्राचा शोध लागल्यानंतर टायरसारख्या एका महत्त्वाच्या घटकानेही क्रांतीच घडवून आणलेली आहे. सर्व प्रकारच्या रस्त्यावरील वाहनांनाच नव्हे तर अगदी विमानासाठीही टायर वापरले जातात, यातच टायरची महती खरे म्हणजे लक्षात येते.
मोटारीला कोणत्या प्रकारचे टायर मोटार कंपन्याकडून दिले जातात, त्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारचे व कोणत्या दर्जाचे टायर बसवता, त्यासाठी रीम कोणत्या प्रकारचे वापरता हा प्रत्येक वापरकर्त्याचा वैयक्तिक आवडीनिवडीचा व पर्यायाचा भाग आहे. अर्थात बसवलेल्या टायरची योग्य ती देखभाल व करणे गरजेचे आहे. टायर ही काही कायम स्वरूपात टिकणारी गोष्ट नाही, तुम्ही जितका त्या टायरचा वापर कराल, जितक्या प्रकाराने त्याची हाताळणी कराल तितके त्याचे आयुष्य कमी अधिक होत असणार आहे. एका ठरावीक कालमर्यादेनंतर तो खराब होतो, त्यासाठी तुम्ही त्या टायरचा वापर किती कसा करता, हे देखील अवलंबून नसते.
कार न वापरता बराच काळ ठेवल्यानेही टायरवर परिणाम होत असतो, त्याच्यावर उन्हापावसाचा, वातावरणाचा परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्ही तुमची कार जितकी वापराल म्हणजेच टायरचा जितका वापर कराल तेवढे चांगले असते. टायर वापरताना रस्ते कसे आहेत, तेथे कशी कार चालवावी, टायरवर असणारे डिझाईन म्हणजे नेमके काय सांगणारे असते, ते खराब झाले, त्या टायरला कट गेला, त्याला भेगा पडल्या, त्या टायरला पंक्चरमुळे खूप नुकसान सहन करावे लागले आहे का, अशा विविध बाबीं सातत्याने टायरबाबत नजरेखाली घातल्या गेल्या पाहिजेत. सर्वसाधारणपणे भारतात कारच्या टायरचे आयुष्य हे ३० हजार किलोमीटरपर्यंत असते.
येथील रस्ते, हवामान याचा विचार करण्याबरोबरच टायरमध्ये तुम्ही हवेचे प्रमाण योग्य ठेवणे अतिशय गरजेचे असते. किंबहुना दररोज टायरची हवा तपासणे, कमी असल्यास भरणे, जास्त असल्यास कमी करणे, व्हॉल्व चांगला आहे की नाही, ट्यूब असेल तर चांगली आहे की नाही, हे ही तपासणे आवश्यक असते. टायरचे योग्य रोटेशन व त्याचा कमाल वापर कसा करावा ते अन्य लेखात पाहू. पण टायरची निगा प्रत्येकाने नीट राखणे, त्याची तपासणी करणे या सर्वात महत्त्वाच्या बाबी तुम्ही केल्याच पाहिजेत. किंबहुना तुमच्या सुरक्षित प्रवासामधील ते एक गमक आहे, हे लक्षात ठेवा.