नवी दिल्ली : भारतातील सत्ता आणि राजकारणाचे प्रतीक मानली जाणारी अॅम्बेसिडर कार (Ambassador Car) लवकरच पुनरागमन करणार आहे. म्हणजेच, ही कार आता पूर्णपणे नवीन लूकमध्ये पुन्हा रस्त्यांवर दिसणार आहे.
अॅम्बेसिडर कार निर्माता कंपनी हिंदुस्थान मोटर्सने (Hindustan Motors) युरोपियन ऑटोमोबाईल कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. या युरोपियन कंपनीचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही, परंतु असे म्हटले जाते की, हा करार Peugeot सोबत केला गेला आहे.
या सामंजस्य करारानुसार, दोन्ही कंपन्या पुन्हा एकदा कंपनीच्या उत्तरपारा प्लांटमध्ये कार आणि स्कूटरचे उत्पादन सुरू करतील. यावेळी अॅम्बेसिडर इलेक्ट्रिक अवतारात परत येईल, पण त्याआधी कंपनी इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवायला सुरुवात करेल.
हिंदुस्थान मोटर्सचे संचालक उत्तम बोस म्हणाले की, नव्या 'Amby'चे डिझाईन, नवा लुक आणि इंजिन यासाठी काम सुरू आहे. ते आधीच अडव्हॉन्स स्टेडमध्ये आहे.
देशातील सर्वात जुना कार प्लांटकोलकाता पासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेला उत्तरपारा कार प्लांट हा देशातील सर्वात जुना कार प्लांट आहे. तर जपानमधील टोयोटाच्या प्लांटनंतर हे आशियातील दुसरे सर्वात जुने प्लांट आहे. हिंदुस्थान मोटर्सच्या अॅम्बेसिडर कार 1970 पर्यंत भारतातील रस्त्यांवर राज्य करत होत्या. नंतर मारुती सुझुकीसारख्या कंपन्यांची स्वस्त वाहने आल्यामुळे बाजारात अॅम्बेसिडर कारची मागणी कमी होऊ लागली. अखेर 2014 मध्ये कंपनीने त्याचे उत्पादन बंद केले.