जगभरात अॅप्पलच्या ईलेक्ट्रीक कारची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच अॅप्पल इलेक्ट्रीक कार आणणार नाही असे वृत्त आले आणि मग चर्चांना सुरुवात झाली आहे. गेल्या दशकभरापासून अॅप्पल या प्रोजेक्टवर काम करत होती. आता या प्रोजेक्टचा खर्च जर पाहिला तर अॅप्पल एखादी ऑटो कंपनी खरेदी करू शकली असती.
अॅप्पलने अत्यंत गोपनिय अशा टायटन प्रोजेक्टवर पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. या टायटन प्रोजेक्टवर अपडेट देण्यास कंपनीने नकार दिला आहे. परंतु जाणकारांच्या अंदाजानुसार कंपनीने या प्रकल्पावर १० अब्ज डॉलर्स एवढा प्रचंड खर्च केला आहे.
न्यूयॉर्क टाईम्सनुसार अॅप्पलला टेस्लाला टक्कर द्यायची होती. परंतु ते तेवढे सोपे देखील नव्हते. कारण अमेरिकेतील फोर्ड कंपनी देखील ईलेक्ट्रीक कार निर्माण करू लागली आहे. काही वर्षांपूर्वी अॅप्पल टेस्ला खरेदी करणार असल्याचेही वृत्त आले होते. नंतर अॅप्पलने सेल्फ ड्रायव्हिंग कार आणण्याचा निर्णय घेतला. यावेळी ती Waymo (वेमो) कंपनीला टक्कर देणार होती. परंतु कंपनीसमोरील संकटे काही कमी होत नव्हती. कंपनीने या प्रकल्पासाठी पोर्श आणि नासामध्येही कर्मचारी तैनात केले होते.
जवळपास २००० लोक या प्रोजेक्टवर तैनात होते, तेव्हाच कथितरित्या अॅप्पलने कार बनविण्याचा प्रोजेक्ट बासनात गुंडाळल्याचे वृत्त आले आहे. यामागची कारणे शोधली जात आहेत. जगभरात ईलेक्ट्रीक कारच्या मागणीत घट झाली आहे. याचे कारण आर्थिक संकट आहे. टेस्ला, रेनो. फोक्सवॅगन आणि अन्य कंपन्या परवडणाऱ्या किंमतीत कार बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे महागड्या अॅप्पलच्या कारकडे कोण जाईल असाही प्रश्न कंपनीसमोर उभा ठाकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जर ही कार लाँच केली गेली असती तर तिची किंमत काही केल्या १ लाख डॉलरपेक्षा कमी असण्याची शक्यता नव्हती.
कंपनीला असे फिचर्स देणे भाग होते जे इतर कंपन्यांपेक्षा वेगळे असतील. सूर्याच्या किरणांपासून उष्णता रोखणारा सनरुफ आणि खिडकीची काच ज्यावर मॅप दिसणार होता, अशी काही फिचर्स चर्चेत होती. या प्रत्यक्षात जरी येणार नसल्या तरी आतापर्यंत अॅप्पलने ज्या गोष्टी शोधल्या आहेत, त्या इतर कंपन्यांसोबत शेअर केल्या जाण्याची शक्यता आहे.