रात्रीच्यावेळी प्रवास करताना अनेक ट्रक, बस, कार यांच्यामागे पुढे चमकणारे स्टिकर्स नजाकतीने लावून नक्षीकाम केलेले दिसते. त्या स्टिकर्सच्या सहाय्याने काहीवेळा नावे, अक्षरेही तयार केलेली असतात. ट्रक्सचे चालक, मालक तर काहीवेळा त्या ट्रकला अशा स्टिकर्सने रंगाने रंगवून वेगळेच सौंदर्य बहाल करीत असतात. पाकिस्तानात तर ट्रक आर्ट म्हणून एक वेगळीच कला मान्यताप्राप्त आहे. वाहन सजवणारी ही कला असून भारतातही पंजाब व अन्य भागात ट्रक असे सजवले जात असतात. एखादे वाहन रात्रीच्यावेळी अन्य वाहनचालकाला झटकन दिसावे यासाठी रिफ्लेक्शनचा गुणधर्म असणारे लाल, चंदेरी स्टिकर लावण्याची पद्धत आहे. सायकललीलाही मागील बाजूल रिफ्लेक्टर असतो.
छोट्या आकाराचा का होईना असा रिफ्लेक्शन देणारा स्टिकर असणे मात्र कधीही चांगले. कारलाही मागील व पुढील बाजूने तसेच सर्व कॉर्नर्सलाही हे रिफ्लेक्टरचे स्टिकर लावता येऊ शकतात. साधारण गोल, चौकोनी आकारामध्ये तयार करून कात्री वा ब्लेडचा वापर करून ते कापता येतात. तुम्हाला देखील ते कारवर आवश्यक ठिकाणी लावता येतात. त्यामुळे रात्रीच्या प्रवासामध्ये अन्य वाहनाला त्याचा फायदा होतो, लांबून त्याला काही कार वा वस्तू रस्त्यांवर आहे असे वाटू शकते. साहिजकच दुस-या वाहनाचा चालक तितका दक्षतेने वाहन चालवू शकतो.
यामुळे दुस-या वाहनाच्यादृष्टीनेही एकप्रकारे रस्त्यावरच्या वाहनांची, वस्तुंची दृश्यमानता वाढते व रात्रीच्यावेळी अन्य वाहनांचा अदाज येण्यास, त्यांना साईड देण्यास, ओव्हरटेक करताना योग्य अंदाज घेण्यास, रस्त्यांवर वळताना, यू टर्न घेतानाही समोरच्या वाहनांला तुम्च्या कारचा अंदाज येतो. अशा प्रकारे ही सांकेतिकता रात्रीच्या ड्रायव्हिंगच्यावेळी सुरक्षितता म्हणून खूप उपयोगाला येऊ शकते.
सर्वसाधारण वैयक्तिक वापराच्या कारसाठीही सुशोभीकरण नव्हे पण सुरक्षिततेसाठी व विशेष करून रात्रीच्या प्रवासामध्ये आपले वाहन दुस-या वाहनाला झटकन दिसावे व आपणही सुरक्षित राहावे म्हणून अशा लाल वचंदेरी रंगाच्या रिफ्लेक्टर्स स्टिकर्सचा वापर करण्यास काहीच हकत नाही. अति वापर करून रंगाचा बेरंग मात्र होणार नाही, याची नक्की काळजी घ्यावी. कारच्या मागच्या बाजूला, नंबरप्लेटच्या वर, सर्व कॉर्नर्सना, कारच्या पुढील बाजूला ग्रीलच्या आसपास मध्यभागी, तसेच कारच्या मागे मध्य वा वरच्या भागातही अशा प्रकारच्या रिफ्लेक्टर्स पट्ट्यांचा वापर करायला हरकत नाही. साधारण एक ते दीड सेंटीमीटर रुंदीच्या या स्टिकर्सच्या पट्ट्या बाजारात मिळतात. त्या आवश्यक त्या प्रमाणात घेऊन कात्री वा ब्लेडचा वापर करून त्या लावता येतील.
रात्रीच्या प्रवासात अन्य वाहनांच्या हेडलॅम्पचा प्रकाश पडल्यास त्या चकाकतात व त्यामुळे तुमच्या कारच्या अस्तित्त्वाची जाणीव अन्य वाहनचालकाला होते. स्कूटर व मोटारसायकल यांनाही अशा पट्ट्यांची अतिशय गरज वाटते. महामार्गावर ग्रामीण भागांमध्ये चालवल्या जाणा-या दुचाकींना अनेकदा टेललॅम्प व ब्रेकलाइटही चालू नसल्याने अपघाताची शक्यता असते. छोट्या छोट्या बाबींचीही ही आवश्यकता किती उपयोगात आणायची हा अर्थातच ज्याचा त्याने निर्णय घ्यायचा असतो. पण ते करीत असताना सुरक्षित वाहतूक वा प्रवास ही संकल्पना ठाम असायलाच हवी.