रशियानं Audi कडून वसूल केली होती महायुद्धातील नुकसान भरपाई, नेमकं काय घडलं होतं वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 09:06 PM2022-03-15T21:06:18+5:302022-03-15T21:06:49+5:30
आज जेव्हा आपण 'ऑडी'चं (Audi) नाव घेतो तेव्हा आपल्याला फक्त महागड्या-लक्झरी आणि उत्तम तंत्रज्ञान असलेल्या कारचाच विचार येतो.
आज जेव्हा आपण 'ऑडी'चं (Audi) नाव घेतो तेव्हा आपल्याला फक्त महागड्या-लक्झरी आणि उत्तम तंत्रज्ञान असलेल्या कारचाच विचार येतो. पण रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जग तिसऱ्या महायुद्धाकडे वळण्याची भीती असताना 'ऑडी'च्या इतिहासातील दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित ही आठवण अगदीच अनोखी ठरते.
'ऑडी'च्या कारवर चार वर्तुळं एकमेकांमध्ये गुंतलेली असा लोगो आपल्याला माहित आहेच. पण या चार वर्तुळांमागचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? खरंतर ऑडीची कथा 1885 पासून सुरू होते, परंतु अनेक चढ-उतारानंतर 1909 मध्ये कंपनीला 'ऑडी' हे नाव मिळाले. कंपनीचे संस्थापक ऑगस्ट हॉर्च यांनी हॉर्चच्या लॅटिन शब्द ऑडी नंतर ही कंपनी जर्मनीतील झविकाऊ येथे सुरू केली. 1910 मध्ये कंपनीने आपली पहिली कार लॉन्च केली. पण 1932 मध्ये कार विश्वात या कंपनीचा इतिहास बदलला गेला. 1932 मध्ये, Audi, Wanderer, DKW आणि Horch या चार कंपन्यांचे विलीनीकरण होऊन ऑटो युनियनची स्थापना झाली, जी त्यावेळी जर्मनीतील सर्वात प्रमुख कार कंपन्यांपैकी एक बनली. या चार कंपन्यांच्या विलीनीकरणाचे प्रतीक म्हणून ऑडीच्या लोगोमध्ये ४ वर्तुळं आहेत.
ऑडी आणि दुसरे महायुद्ध
१९३९ मध्ये युरोपमध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं. या युद्धात हिटलर जर्मनीचं नेतृत्व करत होता. अशा परिस्थितीत युद्ध सुरू झाल्यानंतर कार निर्माता कंपनी ऑडीनं युद्ध वाहनं बनवण्यास सुरुवात केली. 1940 मध्ये, कंपनीने आपली शेवटची सिव्हिल कार (सामान्य लोक वापरत असलेली कार) बनवली आणि दुसरं महायुद्ध (1945) संपेपर्यंत युद्धात वापरता येणारी वाहनं कंपनी बनवत राहिली. युद्धात वापरण्यासाठी वाहन बनवत असल्यानं ऑडी कंपनी मित्र राष्ट्रांच्या निशाण्यावर होती. अशा परिस्थितीत जेव्हा दुसरे महायुद्ध संपले तेव्हा ऑडीला त्याचा फटका सहन करावा लागला.
युद्ध संपल्यानंतर कंपनीचा Zwickau येथील कारखाना सोव्हिएत सैन्याच्या (रशियाच्या नेतृत्वाखालील सोव्हिएत युनियनचे सैन्य) ताब्यात आला. तोपर्यंत ऑटो युनियन (ऑडी) ही एक कार्यरत युनिट नव्हती. मग युद्धाची भरपाई म्हणून, कंपनीचा हा कारखाना सोव्हिएत सैन्याने उद्ध्वस्त केला. यासोबतच कंपनीची संपूर्ण मालमत्ताही जप्त करण्यात आली. ऑटो युनियन नंतर 1949 मध्ये पुन्हा तयार करण्यात आली आणि आज आपण पाहत असलेली ऑडी 1969 मध्ये अस्तित्वात आली. यानंतर ऑडीने आपला रंग बदलला आणि आता ती जगातील आघाडीच्या लक्झरी कार कंपन्यांपैकी एक आहे.