नवी दिल्ली : जर्मनीची लक्झरीयस कार कंपनी ऑडीने आज Audi Q8 ही SUV भारतात लाँच केली. आश्चर्याची बाब म्हणजे कालच मॅच पराभूत होऊन आलेल्या विराट कोहलीने ही कार बुक करत पहिल्या ग्राहकाचा नंबर लावला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने टॅन इंटिरिअरसोबत पांढऱ्या रंगाची ऑडी क्यू 8 खरेदी केली आहे. या एसयुव्हीमध्ये कस्टमाईज मसाज सीटही असणार आहे. क्यू 8 मध्ये 3.0 लीटरचे TFSI BS-6 48V माइल्ड, हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 340 अश्वशक्ती आणि 500 एनएमचा टॉर्क देते. ही एसयुव्ही 250 किमी प्रती तासाच्या वेगाने धावू शकते, एवढा वेग भारतात बॅन आहे.
ऑडी क्यू 8 अवघ्या 5.9 सेकंदांमध्ये 100 किमीचा वेग पकडते. या कारमध्ये 8 स्पीड टिपट्रॉनिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी प्री-सेंस बेसिक, 8 एअरबॅग, ऑडी पार्क असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलाझेशन प्रोग्रॅमसारखे फिचर देण्यात आले आहेत. या एसयुव्हीमध्ये माय ऑडी कनेक्टचे वन अॅप ऑल थिंग्स हे फिचर देण्यात आले आहे.
महत्वाचे म्हणजे ही कार ग्राहकाला हवी तशी रंग, अंतर्गत रचना करता येणार आहे. यामध्ये 11 इंटिरिअर कलर देण्यात आले आहेत. तसेच 9 वूडन इनलेस पर्याय देण्यात आले आहेत. मीडिया इन्फोमध्ये बी अँड ओ 3डी सराउंड साउंड सिस्टम (23 स्पीकर्स, 1920 वॉट्स), वायरलेस चार्जिंगसह ऑडी फोन बॉक्सही देण्यात आला आहे.
Audi Q8 ची लांबी 4.99 मीटर, रुंदी 2 मीटर, उंची 4.99 मीटर आणि जमिनीपासूनची उंची 1.71 मीटर देण्यात आली आहे. लगेज स्पेस 1775 लीटरचे आहे. या ऑडीची किंमत 1.33 कोटी रुपयांपासून सुरू होते.