नेहमी जून महिना पावसाची वाट पाहणारा ठरतो, परंतू यंदा ऑटोप्रेमींचेही वाट पाहणे थांबणार आहे. कारण या महिन्यात बहुप्रतिक्षित मारुती जिम्नीसह ह्युंदाई, होंडाच्या एसयुव्ही लाँच होणार आहेत. आता छोट्या कारचे दिवस संपू लागले आहेत. ज्या लोकांनी पाच-दहा वर्षांपूर्वी छोट्या कार घेतल्या होत्या ते आता मोठ्या एसयुव्ही सारख्या दिवणाऱ्या गाड्यांकडे अपग्रेड करू लागले आहेत.
ग्राहकांचा हाच ओढा ओळखून कार कंपन्यांनी आता छोट्या हॅचबॅक, सेदान कार सोडून कॉम्पॅक्ट एसयुव्हींकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि होंडा या महिन्यात तीन कार लाँच करणार आहे. फेस्टिव्हल सिझनलाही सुरुवात होणार आहे. अशावेळी कंपन्या ग्राहकांना नवीन म़ॉडेल मिळावीत यासाठी प्रयत्नात आहेत.
गेल्या चार-पाच वर्षांपासून नुसती चर्चाच असलेली मारुतीची जिम्नी ही महिंद्राच्या थारसारखी एसयुव्ही लाँच होणार आहे. जागतिक बाजारात सुझुकी या कारचे तीन दरवाज्यांचे व्हर्जन विकत होते. परंतू, भारतीय बाजाराची गरज ओळखून मारुती या कारचे पाच दरवाज्यांचे व्हर्जन आणणार आहे. या जिम्नीला ७ जूनला भारतीय बाजारात उतरविण्यात येणार आहेत .
यानंतर Hyundai Exter ही कार १० जूनला लाँच केली जाणार आहे. सध्या ह्युंदाईकडे टाटाच्या पंचला टक्कर देण्यासाठी कोणती कार नव्हती. या कॅटेगरीमध्ये ह्युंदाईला एक्सटर ही कार मदत करणार आहे.
दुसरीकडे विक्रीमध्ये काहीशी मागे पडलेली होंडा कंपनी ६ जूनला भारतीय बाजारात Elevate SUV लाँच करणार आहे. सध्या कंपनीकडे कोणताही अद्ययावत एसयुव्ही नाहीय. यामुळे ही नवी कार ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टॉस सारख्या कारना टक्कर देणार आहे.