नवी दिल्लीः जगभरातील कार कंपन्यांचा 'कुंभमेळा', अर्थात दिल्लीतील ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये मारुती सुझुकीने आपल्या झळाळत्या 'फ्युचर एस कॉन्सेप्ट'चं दर्शन घडवल्यानंतर ह्युंडाईने i20 फेसलिफ्ट आणि IQNIQ या दोन चकाचक आणि टकाटक गाड्यांची झलक दाखवली.
ह्युंडाईच्या भारतीय बाजारातील प्रवेशाला यंदा दोन दशकं पूर्ण होत आहेत. या २० वर्षांचं सेलिब्रेशन झोकात करण्याच्या हेतूनेच कंपनी कारप्रेमींसाठी दोन अद्ययावत कारची भेट घेऊन येतेय. ELITE i20 याच वर्षी बाजारात दाखल होतेय. ही कार म्हणजे i20 या त्यांच्या लोकप्रिय कारचं पुढचं व्हर्जन आहे. कारचं डिझाइन, आतील रचना बदलण्यात आली असून इतरही नवी फीचर्स या कारमध्ये आहेत.
ह्युंडाई ELITE i20 च्या पेट्रोल व्हर्जनची किंमत 5.34 लाख ते 7.9 लाख रुपयांच्या घरात असेल, तर डिझेल कार 6.73 लाख ते 9.15 लाखांत ग्राहकांना मिळेल.
IQNIQ ही लक्झरी कारही याच वर्षाअखेरीस लाँच केली जाणार आहे. त्याची किंमत 20 लाखाच्या आसपास असेल, असा अंदाज आहे. 2020 पर्यंत नऊ नव्या कार बाजारात आणण्याचा ह्युंडाईचा मानस आहे.