नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने गुरुवारी नोएडामध्ये सुरु असलेल्या ऑटो एक्सपोमध्ये तिस-या जनरेशनची स्विफ्ट कार लाँच केली. मागच्या काही महिन्यांपासून या स्विफ्टच्या या नव्या मॉडेलविषयी बरीच चर्चा सुरु होती. स्टायलिश लुकचे स्विफ्टचे हे मॉडेल लाँच होण्याआधीपासूनच डिमांडमध्ये आहे. अॅडव्हान्स 11 हजार रुपये भरुन अनेकांनी आधीच या कारचे बुकिंग केले आहे.
लाँचिंग आधीच या कारला इतकी मागणी आहे कि, ग्राहकांना कारच्या चाव्या हातात घेण्यासाठी तीन ते चार महिन्यांची प्रतिक्षा करावी लागेल. मारुतीची स्विफ्ट भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. ऑटो एक्सपोमध्ये लाँच झाल्यानंतर आता ग्राहकांना या कारची डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होईल. या नव्या कारचे वैशिष्टय म्हणजे हे मॉडेल हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आले आहे. त्यामुळे आधीच्या मॉडेलच्या तुलनेत ही कार वजनाने हलकी असेल.
मारुती सुझुकीने या कारच्या लुक्सवर जास्त मेहनत घेतली आहे. बाहेरुन तसेच आतून कारला स्टायलिश आणि आरामदायी बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या कारमध्ये 1.2 लीटर सीरीज पेट्रोल इंजिन आणि 1.3 लीटरचे डीझेल इंजिनचा पर्याय मिळेल. त्याशिवाय मारुती 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड बूस्टरजेट इंजिनची वर्जनही लाँच करु शकते. या इंजिनला कंपनीने बलेनो आरएसमध्ये वापरले आहे. नव्या स्विफ्टचे मायलेजही चांगले मिळण्याची शक्यता आहे. स्विफ्ट कार पहिल्यांदा 2005 साली लाँच झाली. त्यानंतर 2011 मध्ये दुस-या जनरेशनचे मॉडेल बाजारात आले आणि आज तिसरे मॉडेल लाँच झाले आहे.
पेट्रोलच्या बेसिक मॉडेलची किंमत 4.99 लाख रुपये, डिझेल मॉडेलची किंमत 5.99 लाख रुपये आणि ऑटोमॅटिक मॉडेलची किंमत 7.49 लाख रुपये आहे.