नवी दिल्लीः वाहन उद्योगातील नवनवे 'कार'नामे दाखवणाऱ्या ऑटो एक्स्पो 2018 मध्ये ट्वेन्टी टू मोटर्स या कंपनीने भारतातील पहिली स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर FLOW (फ्लो)चं अनावरण केलं. 'एक गाडी बाकी अनाडी' या सिनेमातील 'वंडर कार'सारखी चक्रावून टाकणारी फीचर्स या स्मार्ट स्कूटरमध्ये आहेत.
पाच तास चार्ज केल्यानंतर ही स्कूटर ८० किलोमीटरहून अधिक अंतर पार करू शकेल आणि ताशी ६० किमी वेगाने पळू शकेल, असं कंपनीने म्हटलंय. या स्कूटरची किंमत 74,740 रुपये असून आजपासूनच तिचं प्री-बुकिंग सुरू झालंय. भारतासोबतच अन्य देशांमध्येही ही स्कूटर लाँच केली जाणार असून ती काळाच्या बरीच पुढे असल्याचा कंपनीचा दावा आहे.
FLOW ही स्मार्ट स्कूटर आपण रिमोटच्या आधारे ट्रॅक करू शकतो. तसंच, या स्कूटरमध्ये जिओ फेन्सिंग फीचरही देण्यात आलंय. त्यामुळे ती चोरता येणार नाही. आपण ती जिथे पार्क केलीय, तिथून ती हलली तर लगेचच त्याची माहिती मिळेल. त्यासाठी एक स्मार्ट अॅप देण्यात आलंय. ते वापरून आपण ही स्कूटर बंदही करू शकतो. त्याशिवाय, टच डॅशबोर्ड डिस्प्लेवर स्कूटरशी संबंधित माहिती पाहता येऊ शकते.
या स्कूटरचं वजन ८५ किलो असून त्यात एक डीसी मोटार देण्यात आलीय. या स्कूटरच्या अद्ययावत मॉडेलमध्ये ड्युएल बॅटरीचाही पर्याय आहे. त्याशिवाय, टेलिस्कोपिक सस्पेन्शन, दोन हेल्मेटसाठी जागा आणि फोन चार्ज करण्याची व्यवस्थाही आहे.