एकीकडे देशात महाकुंभाची चर्चा असताना दुसरीकडे दिल्लीत वाहन क्षेत्राचा मोठा मेळा भरला होता. १७ ते २२ जानेवारी दरम्यान झालेल्या या ऑटो एक्स्पोमध्ये सुमारे २०० नव्या गाड्या लाँच झाल्या. तर ८ लाख लोकांनी भेट दिली. एवढेच नाही तर सुमारे १५०० कंपन्यांनी त्यांची उत्पादने लोकांना पाहण्यासाठी ठेवली होती.
काही वर्षांपूर्वी ऑटो एक्स्पोचा खर्च खूप असल्याने कंपन्या त्याकडे पाठ फिरवत होत्या. परंतू, सध्या फिचर्स, सोशल मीडियाचा प्रभाव आणि नवीन ट्रेंडच्या प्रवाहात रहायचे असल्याने सर्वच कंपन्या यात भाग घेऊ लागल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे ईलेक्ट्रीक वाहनांनी या ऑटो एक्स्पोमध्ये कल्ला केला आहे.
मारतीने त्यांनी पहिली ईलेक्ट्रीक कार आणली आहे. तर टेस्लाला टक्कर देऊ शकणाऱ्या विनफास्ट या कंपनीने भारतात एंट्री केली आहे. याचबरोबर एकसोएक कंपन्यांनी आपापली उत्पादने दाखविली आहेत. यंदाचा ऑटो एक्सपो एवढा मोठा होता की तीन ठिकाणी तो विखुरण्यात आला होता. भारत मंडपम, यशोभूमी आणि ग्रेटर नोएडाच्या एक्स्पो मार्टमध्ये हा एक्स्पो भरविण्यात आला होता.
वाहन निर्मात्यांसोबतच सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, टायर, बॅटरी आणि सॉफ्टवेअर कंपन्यांनी देखील या एक्स्पोमध्ये भाग घेतला होता. जसजसे तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले आहे,हायटेक फिचर्स वापरली जात आहेत, तसतशे सॉफ्टवेअर कंपन्यांचा देखील ओढा ऑटो कंपन्यांकडे वळू लागला आहे. ऑटो कंपन्यांत एमजी त्या बाबतीत सरस आहे. यामुळे येत्या काळात ईलेक्ट्रीक वाहनांबरोबरच इंधनावरील वाहनांचाही चेहरा मोहरा बदलला जाणार आहे.