Maruti Grand Vitara With ADAS: आजकाल ग्राहकांना सर्वप्रकारचे फीचर्स असलेल्या कार घेण्यात रस आहे. अनेक कार कंपन्या ADAS (Advanced Driver Assistance System) ने सुसज्ज असलेल्या कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहेत. ग्राहकांची मागणी पाहता मारुती सुझुकीदेखील ADAS-सुसज्ज ग्रँड विटारा मीडियम साईज SUV लॉन्च करण्याचा विचार करत आहे. ADAS-सुसज्ज मारुती ग्रँड विटारा पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून 2024) लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
हे फीचर ग्रँड विटाराच्या स्मार्ट हायब्रीड आणि स्ट्रॉंग हायब्रिड व्हेरिएंटच्या टॉप-एंड मॉडेलमध्ये दिले जाण्याची शक्यता आहे. यात लेव्हल 2 ADAS असेल. केवळ ग्रँड विटाराच नाही तर टोयोटा हायराईडरमध्येही एडीएएस तंत्रज्ञान मिळण्याची शक्यता आहे. ग्रँड विटाराची किंमत 10.70 लाख रुपयांपासून सुरू होते, ती 19.20 लाख रुपयांपर्यंत जाते. विशेष म्हणजे, ही कार सुमारे 28kmpl पर्यंत मायलेज देते.
या ADAS सुसज्ज ग्रँड विटारामध्ये ऑटोनॉमस इमरजन्सी ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, ऑटो हायबीम आणि इतर अनेक फीचर्स मिळतील. रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकी आधीपासून ICAT (इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी) सोबत मानेसर ट्रॅकवर टेस्ट रनसाठी बातचीत करत आहे.
ADAS-सुसज्ज ग्रँड विटारा आणि हायरायडरची निर्मिती टोयोटा किर्लोस्कर मोटरद्वारे केली जाईल. आधीपासूनच ग्रँड विटाराची निर्मिती इथे केली जात आहे. नवीन ADAS-सुसज्ज ग्रँड विटारा ADAS तंत्रज्ञानासह उपलब्ध असलेल्या Kia Seltos आणि Honda Elevate शी स्पर्धा करेल.